Sindhutai Sapkal अनाथांची माय हरपली : शरद पवार, उध्दव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, रोहित पवार सह आदी मान्यवरांची श्रध्दांजली !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 5 जानेवारी 2021 । अनाथांची माय तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांनी मंगळवारी रात्री वयाच्या 75 व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला.सिंधुताईंच्या निधनानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून अनेकांनी श्रध्दांजली वाहत सिंधुताईंच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयंत पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अस्लम शेख, मंत्री धनंजय मुंडे, रोहित पवार सह आदी नेत्यांनी सिंधुताईंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली आहे.

सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक  – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. यावेळी पवार म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे.अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अनाथांची मातृदेवा हरपली : मुख्यमंत्री

सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.

दीड वर्षांपूर्वी सिंधूताईनी स्वतः आपल्याशी दूरध्वनीवर बोलून विचारपूस केली होती आणि कोविडच्या लढ्यासाठी बळ दिलं होतं याची आठवण काढून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राची मदर तेरेसा असं त्यांना संबोधलं जायचं ते अगदी बरोबर होतं. दुःख कुरवाळत बसू नका तर पुढे चालत रहा हे त्यांच्या जीवनाचं तत्व होतं. इतक्या खस्ता त्यांनी खाल्ल्या, कष्ट उपसले, समाजाकडून कायम दुस्वास होत होता, पण माईंनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मिटू दिलं नाही.

पद्मश्री सारखा महत्वाचा पुरस्कार मिळूनही त्या आपल्या प्रतिक्रियेत म्हणाल्या होत्या की मला अजूनही अनेकांपर्यंत पोहचून त्यांना घास भरवायचे आहेत. साधी राहणी, उच्च विचारसरणी याचे यापेक्षा काय उदाहरण असेल? त्या सदैव अनाथ, निराधारांच्या कल्याणाचा विचार करत असत. स्वतःच्या जीवनात आलेल्या दुःखाला बाजूला सारून त्यांनी अनेकांना आधार दिला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा डोंगर उभा केला. या कामामुळेच अनेक मुली, महिला, निराधारांना आयुष्यात मायेची सावली मिळाली.

त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

महाराष्ट्र वात्सल्यसिंधू मातेला मुकला – देवेंद्र फडणवीस

वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत.

या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान.पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या,हे अधिक स्मरणात आहे.त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे. महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे.सिंधुताई सपकाळ यांना माझी विनम्र श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे. असे ट्विट विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे माई – धनंजय मुंडे

‘बाळ धनंजय, माईने समाजाला खूप दिलं, पण माईच्या संस्थेला सरकार म्हणून काहीतरी देणारा तूच रे पहिला…असं म्हणून माझ्या कार्याला अभिनव पोहोच पावती देणारी अनाथांची माय, पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त व्यथित करणारे आहे. निस्वार्थ समाजसेवा या शब्दाचा समानार्थी शब्द माई माईंच्या जाण्याने अनाथ, दीन-दुबळ्यांचे हक्काचे आशा स्थान काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण आदरांजली माई अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे.

हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील. सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!

अनाथांची माय हरपली – बाळासाहेब थोरात

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वात्सल्यमूर्ती, थोर सामाजिक कार्यकर्त्या, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकाली निधनाने हजारो अनाथांची माय हरपली आहे. अनंत अडचणींचा सामना करत त्यांनी हजारो बालकांचा पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळ केला होता. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य  – जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त दुखःद आहे. स्वतःसाठी जीवन जगण्यापेक्षा इतरांसाठी जीवन व्यतीत करणे खूप कमी जणांना शक्य होते, त्यापैकी एक सिंधुताई सपकाळ होत्या. सिंधुताईंसारखी व्यक्ती महाराष्ट्राच्या भूमीत जन्मली हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सिंधुताईंनी स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्यातील दुःख बाजूला ठेवून हजारो अनाथ मुलांना सांभाळलं, त्यांना शिकवलं, त्यांची लग्न लावून दिली व त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं. मानवतेचे हे महान कार्य सिंधुताईंनी मोठ्या कष्टपूर्वक पार पाडले. सिंधुताईंचे निधन ही महाराष्ट्राची झालेली खूप मोठी हानी असून, हि पोकळी कधीही भरून निघणार नाही. सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

सिंधुताईंचे निधनाची बातमी मनाला चटका लावणारी  – हसन मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ज्येष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७३) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला – रोहित पवार

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले की, जेष्ठ समाजसेविका आणि हजारो अनाथ मुलांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७३) यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत समाजकार्याचा एक वेगळा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!

सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

अनाथांची माई जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्याच्या गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु केली होती. आपल्या सेवाकार्याच्या माध्यमांतून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. अनाथांची माय म्हणून उभा महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. आज तीच अनाथांची माय महाराष्ट्राला पोरकी करून गेली 

सिंधुताई सपकाळ यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.