mucormycosis : म्युकरमायकोसिसने राज्यात घेतले 90 बळी; वाढती रूग्णसंख्या बनली चिंताजनक !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात करोनाची साथ नियंत्रणात येत असली तरी म्युकरमायकोसिस या रोगाचा झपाट्याने होत असलेला प्रसार चिंताजनक बनत चालला आहे. या रोगाने आतापर्यंत राज्यात 90 रुग्णांचा बळी घेतला आहे. तर 500 रुग्णांनी या आजारावर यशस्वी मात केली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये 850 पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी माध्यमांशी दिली आहे. (90 victims of mucormycosismucormycosis in the state; The growing number of patients has become alarming!)

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारासाठी अत्यावश्यक इंजेक्शनची सध्या टंचाई असल्याने केंद्र सरकारने त्वरित वाढीव साठा उपलब्ध करून देण्याची मागणीही टोपे यांनी केली.सरकारने टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध लागू केल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या पुढे गेले असून सक्रिय रुग्णांची संख्याही सात लाखांवरून चार लाखांपर्यंत खाली आली आहे. करोना रुग्णांवरील उपचाराबाबत सरकारकडे प्राणवायू, रेमडेसिविरसह अन्य पुरेशा सुविधा उपलब्ध असून करोना नियंत्रणात येत आहे ही दिलासादायक बाब असली तरी म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) आजार चिंता वाढविणारा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिस आजारावरील उपचारामध्ये बुरशीविरोधी औषधे महत्त्वाचा भाग असून त्याची टंचाई आहे. त्यासाठी एक लाख 90 इंजेक्शन खरेदी करण्याचे कार्यादेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्राने ताब्यात घेघेतल्याने पुढील दहा दिवस इंजेक्शनची तीव्र टंचाई भासणार आहे असेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.