11 district in danger zone । अहमदनगरसह 11 जिल्हे डेंजर झोनमध्ये ; मात्र ऊर्वरित राज्याला दिलासा
सरकारने जारी केली नवी नियमावली
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने कोरोना नियमावलीत सूट देण्याचा निर्णय सोमवारी ०२ ऑगस्ट रोजी घेतला आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने तिथे कठोर निर्बंध लागू असतील असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील ज्या बहुतांश भागात कोरोना परिस्थिती सामान्य पातळीवर येऊ लागली आहे अश्या भागातील अत्यावश्यक व अत्यावश्यक नसलेली दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे तशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज सोमवारी सायंकाळी केली.
राज्याच्या बहुतांश भागाला दिलासा मिळाला असला तरी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये कोरोना नियमावली (लेव्हल थ्री) लागू असणार आहे. या जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग सतत वाढत आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आणखी काही दिवस कठोर निर्बंधाला सामोरे जावे लागणार आहे.
सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावली
1) राज्यातील अकरा जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानं आठ वाजेपर्यंत उघडी राहतील.
2) शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
3) शनिवारी दुकानं दुपारी तीन वाजेपर्यंत दुकानं उघडी राहू शकतील.
4) गार्डन आणि मैदानं व्यायामासाठी खुली असतील. चित्रपटगृहं मात्र बंदच राहतील.
5) मुंबई, मुंबई उपनगरं आणि ठाणेमध्येही सध्या तरी निर्बंध लागू राहतील. त्यासंदर्भातला निर्णय स्थानिक आपात्कालीन यंत्रणा प्रशासन घेईल.
6) सरकारी आणि खाजगी कार्यालयं पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. प्रवासादरम्यान गर्दी टाळण्यासाठी कार्यालयाच्या वेळी विभागण्याची सूचना करण्यात आली आहे.
7) शेतीविषयक कामकाज, सिव्हिल वर्क, औद्योगिक काम, मालवाहतूक यांचं कामकाज पूर्ण क्षमतेनं सुरू राहील.
8)जिम, योग केंद्र, सलून, ब्युटी पार्लर, स्पा हे वातानुकूलित यंत्रणेविना 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री आठवाजेपर्यंत सुरू राहू शकतात. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत या सगळ्यांना परवानगी देण्यात आली आहे.
यांना अजुनही परवानगी नाही
1) चित्रपटगृहं, नाटयगृहं, मल्टीप्लेक्स यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
2) सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं बंदच राहतील.
3)रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत जाण्यायेण्यावर निर्बंध असतील.
4) गर्दी टाळण्यासाठी वाढदिवसाचे कार्यक्रम, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, निवडणूक संदर्भातील रॅली, आंदोलन मोर्चे यांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सांगलीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “रुग्णवाढ कमी होत नाही अशा जिल्ह्यात दुकानांच्या वेळेवर बंधनं कामय राहतील. पण, इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा 8 वाजेपर्यंत वाढवत आहोत.”ही घोषणा केली आहे.
राज्यात सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, आणि अहमदनगरमध्ये रुग्णवाढीचा दर राज्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे, या जिल्ह्यांमध्ये लेव्हल-3 चे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात कोरोनासंसर्गाचा दर गेल्याकाही दिवसांपासून नियंत्रणात असल्याचं दिसून येतंय. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यात रुग्णवाढीचा साप्ताहिक दर 0.11 टक्के तर, जिल्ह्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 3.8 टक्के आहे राज्यात गेल्याकाही दिवसात कोरोनाग्रस्तांच्या सरासरीचं प्रमाण 6500 च्या आसपास आहे.