- Advertisement -

अखेर जिद्द जिंकली : एकलव्याने घेतली गगनभरारी ; शेतकऱ्याचं पोर निघालयं लंडनला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अंगी जिद्द असेल अन कठोर परिश्रम घेण्याची तयारी असेल तर जग जिंकता येतं हे करून दाखवलं आहे एका शेतकर्‍याच्या पोरानं, चक्क जगातली सर्वात प्रतिष्ठेची स्कॉलरशिप मिळवून हा पोरगा आता थेट शेताच्या बांधावरून लंडनच्या प्रवासाला निघालाय. या शेतकरीपुत्राची ही कहाणी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसह तरूणाईसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

त्या तरुणाचं नाव आहे राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातलं पिंप्री (खंदारे) हे त्याचं मूळ गाव. राजूचे आई वडील शेतकरी. त्याची घरातील पहिलीच पिढी जी उच्च शिक्षण घेत आहे, ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे.फर्स्ट जनरेशन लर्नर असणाऱ्या राजूने दहावी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. बारावीला चांगले गुण मिळाले आणि भारत विद्यालय बुलडाणा येथे शिकत असताना डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी काम करूया अस ठरवल. त्याच दरम्यान विविध सामाजिक शैक्षणिक विषयांवरची पुस्तके त्याच्या वाचनात आली,चित्रपट पाहण्यात आले.सरते शेवटी आपण स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात यावं अस त्याने निश्चित केल.स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी राजू पुण्यात आला.पण आर्थिक अडचण, योग्य वेळी न मिळालेले मार्गदर्शन आणि माहितीचा अभाव ह्यामुळे त्याला पुणे विद्यापीठातून मुक्त विद्यापीठात प्रवेश घ्यावा लागला. फर्ग्युसन कॉलेजच्या प्रवेशाची तारीख तर त्याला निघून गेल्यावर समजली. ह्या सगळ्यामुळे नाईलाजाने राजूला पुणे सोडवं लागलं.

स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासा दरम्यान राजूला मेळघाटला जायची संधी मिळाली. अमरावती मधील मेळघाट येथे बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी मैत्री संस्थेतर्फे दरवर्षी पावसाळ्यात धडक मोहिमेचे आयोजन केले जाते. आधी स्वयंसेवक आणि आता मेळघाट मित्र म्हणून काम करताना महाराष्ट्रभरातील हजारो स्वयंसेवकांसोबत त्याने नेटवर्क उभे केले. मेळघाटच्या अनुभवाने प्रत्यक्ष समाजाशी आणि प्रश्नांशी तो अधिकाधिक जोडला गेला. स्पर्धापरीक्षा करून आपण भविष्यात समाजबदल घडवून आणू हे स्वप्न पाहताना त्याला वर्तमानकाळातील प्रश्न आणि समस्या अस्वस्थ करत होत्या. त्यामुळे आजचे प्रश्न समजून घेऊन आधी त्यावर उत्तर शोधली पाहिजेत अस त्याने ठरवलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न नैसर्गिकरित्या गळून पडलं.

TISS तुळजापूर येथे रुरल डेव्हलपमेंट या विषयात पदव्युत्तर समाजकार्य शिक्षण घेत असताना त्याने वर्गात शिकेलेले प्रत्यक्ष जमिनीवर उतरवण्यासाठी ग्राम परिवर्तन चळवळीच्या माध्यमातून स्वतःच्या गावातच काम करायचं ठरवलं.२०१५ मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच निश्चित केल. त्याने त्याच्या गावाच्या विकासाचा जाहीरनामा चक्क बॉण्ड पेपर वर लिहून लोकांना सुपूर्द केला. २० कलमी जाहीरनामा अभ्यासपूर्ण दूरदृष्टी ठेऊन, लोकांशी चर्चा करून त्याने तयार केला होता. आजही तो प्रत्येक गावासाठी विकासाचा रोड मॅप ठरू शकेल, पण प्रस्थापित राजकीय समाजाने ह्या तरुणाला मागे खेचण्याचा प्रयत्न केला. खूप अडथळे आले. आणि ही निवडणूक तो हरला तरीपण तो खचला नाही. त्याने यातून शिकवण घेत काम सुरूच ठेवले.

पुढे मुख्यमंत्री रुरल डेव्हलपमेंट फेलोशिप मध्ये असताना राजूने यवतमाळ मधील पारधी बेड्यांमध्ये ग्राम पंचायतींसोबत लोकसहभागातून महत्त्वाची विकास कामे केली. या कामावर त्याची शॉर्ट फिल्म बनवून शासनाकडून दखलही घेण्यात आली. हे करताना नवीन प्रश्नांची ओळख होऊन भविष्यात काय करायचं हे देखील अधिकाधिक स्पष्ट होत गेलं. शिक्षण हेच आदिवासी, दलित, भटके विमुक्त, बहुजन, गरीब कुटुंबामधील मुलांना पुढे आणू  ह्यावर राजूचा विश्वास असल्याने त्याने शैक्षणिक उपक्रम घ्यायला सुरू केले. ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी आणि पुस्तके उपलब्ध करण्यासाठी त्याने यवतमाळ येथे पहिली पुस्तक संकलन मोहीम राबवली. पुढे तेच अमरावती, पुणे, मुंबई अशा ठिकाणी राबवत ३० हजार पेक्षा जास्त पुस्तके या मोहिमेतून गोळा केली आणि ग्रामीण भागांतील लायब्ररी मध्ये वितरित केली.

पुढे यवतमाळच्या सावित्री ज्योतिबा समाजकार्य महाविद्यालात Visiting Faculty म्हणून काम करत असताना राजूने तिथे एकलव्य नावाने एक शैक्षणिक चळवळ सुरू केली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या , आदिवासी, दलित, ग्रामीण, भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणायचं.  जे फर्स्ट जनरेशन लर्नर्स आहेत त्यांना भारतातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून राजूने एकलव्य चळवळीच्या माध्यमातून हक्काची मार्गदर्शनाची जागा सुरु केली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करत डेव्हलपमेंट किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये तळागाळातील नेतृत्व उभे करण्या च्या हेतूने एकलव्य प्रयत्नशील आहे. आज एकलव्यची  चौथी batch देशातील नामांकित संस्थांच्या प्रवेश पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. मागील ४  वर्षात १२५ पेक्षा जास्त विद्यार्थी विविध नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत तसेच प्रतिष्ठीत फेलोशिप मध्ये काम करत आहेत. काहींनी स्वतःचे काम पण सुरु केले आहे. या चळवळीतून पुढील १० वर्षात किमान २००० तरुण चेंगमेकर्स तयार करायचे आहेत असे राजू आत्मविश्वासाने सांगतो. यवतमाळ मध्ये रोवलेल एकलव्यच बीज आज महाराष्ट्रच नाही तर देशभर  पसरत आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये सुद्धा एकलव्य टीमने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले, स्थलांतरित व अडकलेल्या कामगारांसाठी खास हेल्पलाईन चालवली. जवळपास  तीन हजार कुटुंबापर्यंत मदत पोहचविली, मुक्त संवादासाठी मोकळा संवाद कौन्सिलिंग उपक्रम राबविला.

राजू खास ठरतो तो त्याच्या स्वप्न बघून पूर्ण करण्याची ताकद असणाऱ्या जिद्दी स्वभावामुळे! एवढ सगळ काम करून तो थांबला नाही. परदेशात जायचं त्याच अनेक वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण करायचं त्याने ठरवल. त्यासाठी लागणारी मेहनत जोडीला होतीच, त्यामुळे जगातील सर्वोच्च अश्या १८ विद्यापीठांमध्ये तो उच्च शिक्षणासाठी निवडला गेला. पण समोर मोठा प्रश्न होता तो जायचं कस. शैक्षणिकदृष्ट्या पेलवलेल हे धनुष्य आर्थिकदृष्ट्या पेलवण्यासाठी त्याला गरज होती ती स्कॉलरशिपची. वडील म्हटले, आपली संपूर्ण जमीन विकली तरीदेखील आपल्याकडून ४५ लाख रुपये जमा नाही होणार. शिवाय लोन घ्यायचं तर ते मिळण पण शक्य नव्हत. इथेही हा पठ्ठ्या निराश न होता स्कॉलरशिप मिळावी म्हणून प्रयत्न करत राहिला.भविष्यात नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटीश सरकार स्कॉलरशिप देते हे त्याला माहिती पडले.आणि तब्बल आठ ते दहा महिने राजू त्यासाठी प्रयत्नशील राहिला. २९ जूनला निकाल आला आणि अखेर ब्रिटीश सरकारची अत्यंत प्रतिष्ठित अशी Chevening स्कॉलरशिप त्याने मिळवली. या स्कॉलरशिप च्या इंटरव्ह्यू दरम्यान पॅनेल ने राजु ला शेवटचा प्रश्न विचारला,  तुझी या स्कॉलरशिप साठी निवड झाली नाही तर काय करशील?  “माझं नाही झालं तरी पुढच्या १० वर्षांत १० एकलव्य चेवनिंग Scholars असतील.” हे त्याचे उत्तर होते.

ब्रिटीश सरकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमातील एक महत्वाची आणि मानाची समजली जाणारी ही स्कॉलरशिप आहे. पदव्युत्तर शिक्षणासाठी जे युवक युकेमधल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊ इच्छितात, अश्या जगभरातील युवा नेतृत्व करणाऱ्या तरुणांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते. या स्कॉलरशिप साठी १६० देशांमधील ६३ हजार ॲप्लिकेशन होते, त्यातले ५ हजार विद्यार्थ्यांनी २ राऊंड नंतर मुख्य इंटरव्ह्यू दिला, आणि १३५० विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली. म्हणजे १.५% इतका इतका acceptance rate. जवळपास ४५ लाख रुपयांची ही स्कॉलरशिप असून इंग्लंड मध्ये शिकायला लागणारा सर्व खर्च पुरवते. Chevening scholarship चे वैशिष्ट्य की, यूके मध्ये शिकून परत मायदेशी येऊन काम करू पाहणाऱ्या leaders नाच संधी दिली जाते. राजू मधले पोटेंनशियल त्यांनी ओळखले. या स्कॉलरशिप मध्ये राजू कदाचित पहिला असा विद्यार्थी असावा जो पदवी पर्यन्त मराठी माध्यमात आणि पदवी मुक्त विद्यापीठातून शिकलेला आणि भटक्या जमाती (nomadic tribe community) मधून येणारा. राजु या स्कॉलरशिप मध्ये खऱ्या भारताचे प्रतिनिधित्व करतो.

प्रस्थापित अनेक समजांना राजूच्या यशाने सणसणीत थोबाडीत मारलेली आहे.  पुण्यात जा.. पेठेत रहा..लायब्ररी लाव.. आणि एमपीएससी कर तरच आयुष्य सार्थकी लागेल ह्या समजाला आता थोडा तरी छेद जाईल असे वाटते. अनेक तरुण स्पर्धा परिक्षेचं वारं वाहत असताना उच्च शिक्षणाची वारी करायला गेले तर देशाच्या विकासाला मोठं हातभार लागेल असं राजुला वाटते.

राजू म्हणतो . ‘’ माझा युकेपर्यंतचा प्रवास माझ्यासारख्या सर्व फर्स्ट जनरेशन लर्नर्सला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, हे मला पक्के माहित आहे.माझी ही स्कॉलरशिप म्हणजे एकलव्यच्या शैक्षणिक चळवळीचा भक्कम पाया असणार आहे अस म्हणायला हरकत नाही. ह्या संपूर्ण प्रवासात माझ्या कुटुंबाची, मार्गदर्शकांची, मित्रांची आणि महत्वाचे म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांची साथ मला मिळाली आहे. त्या सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद म्हणायचंय, आणि सर्वांचं अभिनंदन करायचं आहे, कारण ही स्कॉलरशिप माझ्या एकट्याची नाहीये, हजारो लाखो फर्स्ट जनरेशन लर्नर्स ला ही स्कॉलरशिप मी समर्पित करतोय!

शब्दांकन – ऐश्वर्या स्वाती बाळकृष्ण