पाटोद्यातील हरिनाम सप्ताहात रोजेदार मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन, राज्यभरात होतेय पाटोदेकरांचे कौतुक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : देशात हिंदू – मुस्लिम द्वेषाचे राजकारण सातत्याने तापवून राजकीय पोळ्या भाजण्याचे उद्योग राजकीय पक्षांकडून सतत होत असले तरी देशातील सर्वच समाजात सामाजिक सलोखा असल्याचे अनेक घटनांमधून समोर येत असते, अशीच एक सामाजिक सलोख्याचे घटना बीडमधून समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या विविध गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत, तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिनाही सुरू आहे. अश्या पवित्र धार्मिक पर्वाची पर्वणी साधून हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण अंबाजोगाई जवळील पाटोदा या गावातून समोर आले आहे.

पाटोदा येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहमध्ये रोजा (उपवास) धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे (इफ्तारपार्टी) आयोजन करण्यात आले होते. तसेच हिंदू बांधवांसाठी प्रसादाच्या पंगतीचेही आयोजन करण्यात आले होते. एकाच मांडवाखाली ही व्यवस्था करण्यात आली होती. पाटोदा गावाने घेतलेल्या उपक्रमाचे जोरदार कौतुक होत आहे.

पाटोदा गावात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची नुकतीच समाप्ती झाली. समाप्तीच्या दिवशी सायंकाळी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रमजानचे रोजे धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक द्वेषाचा गावकरी कधीच बळी पडणार नाहीत असाच संदेश या कृतीतून गावकरी मंडळींनी दिला आहे. या कृतीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

पाटोदा गावात गेल्या 26 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू आहे. राम नवमी ते हनुमान जयंती या काळात याचे दरवर्षी आयोजन केले जाते. सप्ताहात मुस्लिम बांधवांची पंगत असते, दरवर्षी होणार्‍या या सप्ताहात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या आनंदाने सप्ताहात सहभागी होतात.पाटोदा गाव नेहमी विधायक कामांमध्ये अग्रेसर असते. यंदाच्या अखंड हरिनाम सप्ताहातून पाटोदेकरांनी समाजिक सलोख्याचा अनोखा संदेश देत नवा पायंडा पाडला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्षांकडून सुरू आहे, यामुळे जनतेत चिंतेचे वातावरण आहे, अश्यातच बीड जिल्ह्यातील पाटोदा गावाने अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम समाजातील रोजेदारांसाठी पंगतीचे आयोजन करून धार्मिक तेढ निर्माण करणारांना सणसणीत चपराक दिली आहे. या कृतीतून पाटोदेकरांनी सामाजिक ऐक्याचा संदेश आहे. दरम्यान याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.