कर्जत – जामखेडच्या भाजपमध्ये का राहिला नाही ‘राम’ ?

अहमदनगर । विजय डोळे |  कर्जत-जामखेडमध्ये ‘कायम वजनात’ असणाऱ्या भाजपाची आजची अवस्था पाहता नेमकं इथं चाललंय काय ? असा प्रश्न कोणाला पडला नसेल तर नवलच. त्याला कारण असे की, मागील काही दिवसांपासून मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे सुरु असलेले राजीनामास्त्र, खरं तर आतापर्यंत हे गांभीर्याने घेण्यासारखं अजिबात नव्हतं कारण ‘भेळ तिकडे खेळ’ उक्तीप्रमाणे जिकडे सत्ता असते तिकडे गल्लीतील नेतेमंडळी चिटकत असातात.

मात्र भाजपा नेते नामदेव राऊत यांच्या राजीनाम्याने या राजीनामा सत्राला माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष यांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राऊत यांचे कर्जत आणि जामखेडमध्ये मोठे वलय असल्याने त्यांच्या पक्षांतराचा मतदानावर किती प्रमाणात परिणाम होतो हे येणाऱ्या काळातच दिसेल तो आज चर्चेचा मुद्दा नाही तर मुद्दा हा आहे की, भाजपवर अशी वेळ का आली ?

पदाधिकाऱ्यांचा शिंदेंवर भरवसा नाही का ?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील विशेषतः कर्जत तालुक्यातील पदाधिकारी राजीनामे देत आहेत. यावरून माजी मंत्री राम शिंदे हे पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यास कमी पडतात काय ? असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहवत नाही. कारण आपला नेता जेव्हा विरोधी बाकावर असतो तेव्हाच त्याच्या कार्यकर्त्याची आणि नेत्याची खरी परीक्षा असते. त्यामुळे एक तर शिंदे कार्यकर्त्यांना – पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यास कमी पडतायत किंवा कार्यकर्त्यांनी भाजपात ‘राम’ राहिला नसल्याने आपला पराभव टाळण्यासाठी ‘सेफ गेम’ खेळला असच म्हणावं लागेल.

पक्षांतरासाठी दबावाची चर्चा

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून मतदारसंघात एक ‘दबकी’ चर्चा ऐकू येतेय ती म्हणजे, आमदार रोहित पवार गटाकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर – पदाधिकाऱ्यांवर पक्षांतरासाठी दबाव निर्माण केला जात आहे. त्यासाठी एक स्वतंत्र टीम कार्यरत असून खास करून मतदारसंघातील विविध कामातील भ्रष्टाचार, अवैध धंदे यात सामील असणाऱ्यांना ‘टार्गेट’ केलं जात असल्याचे बोलले जाते. यात तथ्य काय हे संबंधित पदाधिकारीच सांगू शकतात.

पवारांचा शिंदेवर ‘डाव’

मागील काही दिवसांत विकास कामांबाबत पत्रकार परिषदांची चढाओढ चालू होती. खरं तर विकासकांमाची चढाओढ असली पाहिजे. यामुळे मतदारसंघाचा विकास अधिक गतीने होण्यास मदत होईल. मात्र हि चढाओढ कोणी कामे आणली आणि कोणी केली, इथपर्यंतच मर्यादित राहिली. यात एक सहसा नजरेत न पडणारी गोष्ट घडली ती म्हणजे, प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष, माजी आमदार, चौदा- पंधरा खात्यांचे माजी मंत्री असलेले प्रा. राम शिंदे हे एकटेच किल्ला लढवत असल्याचे दिसून आले. यावेळी शिंदेनी केलेल्या आरोपांवर आमदार रोहित पवारांनी उत्तर न देता मतदार संघाच्या अध्यक्षाला म्हणजे प्रा. मधुकर राळेभात व दत्तात्रय वारे यांना उत्तर देण्यास सांगून इथून पुढे शिंदे सोबतच्या स्पर्धेत आपण नसल्याचा त्यांनी मेसेज दिला असल्याची चर्चा आहे. आ. पवार हे मुसद्दी राजकारणी असल्याचे त्यांनी अनेकवेळेस दाखवून दिले मात्र यावेळी त्यांनी मास्टरस्ट्रोकच मारला असे म्हणायला हरकत नाही.

यंत्रणा शिवाय शिंदेंना जड जाणार !

आ.पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्याच काय तर विरोधकांच्या मनातही आपलं घर निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत. याच सर्व श्रेय त्यांच्या मार्केटिंग टीमच आहे. पवारांची यंत्रणा अगदी तळागाळात काम करताना दिसून येते. विरोधकांच्या हालचाली, नागरिकांच्या समस्या, सर्व्हे, मतदारांपर्यंत विकासकामांची माहिती पोहचवणे, कार्यकर्ते आणि मतदारांच्या कायम संपर्कात राहणे अशी विविध कामे हि यंत्रणा करताना दिसून येते. तसेच पवारांचा सोशल मीडिया तर अतिशय ‘पॉवरफुल’ आहे.

या उलट ज्या परफेक्ट मॅनेजमेंटसाठी भाजपा ओळखली जाते तसे कोणतेही कामे मतदारसंघात दिसून येत नाहीत. स्वतः शिंदेही जनतेमध्ये जायला हवेत तसे अद्याप जाताना दिसून येत नाहीत त्यामुळे कार्यकर्ते तर लांबच असल्याचे दिसते. कार्यकर्त्यांमध्येही म्हणावा तसा जोश पहावयास मिळत नाही. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे सोडता कोणताही कार्यकर्ता – पदाधिकारी पवारांचा रोष पत्करायला तयार दिसत नाही. त्यामुळे स्वतः शिंदेंना मैदानात उतरून नुसतंच ‘वजन’ वाढलेल्या कार्यकर्त्यांना थोडं बाजूला सारून नवीन कार्यकर्त्यांची फळी तयार करावी लागणार आहे. स्वतःची यंत्रणा स्ट्रॉंग करून त्याला लीड केले तरच ते पवारांचा सामना करू शकतात अन्यथा कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पवारांच्या यंत्रणेसमोर शिंदेचा निभाव लागणं सध्यातरी कठीणच आहे.

(लेखक – विजय डोळे हे मुंबई तरूण भारतचे माजी मुख्य उपसंपादक आहेत)

– विजय डोळे
9890740042