हृदयद्रावक: समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, मुलीचा MBA प्रवेश करून नागपुरला परतणारं अख्खं कुटुंब संपलं; ६ जणांचा मृत्यू, वर्ध्यातील थरारक घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : काळजाचा थरकाप उडवणारी मोठी दुर्घटना समृद्धी महामार्गावरून समोर आली आहे. रविवारी मध्यरात्री समृध्दीवर एका भीषण अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने कारला पाठीमागू जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. कारमध्ये असणारे चौघे आणि ट्रकमधील दोघांचा या भयानक अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धामध्ये समृद्धी महामार्गांवर भीषण अपघात झाला. कारला पाठीमागून ट्रकने धडक दिली. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. पुलगांव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विरूळ इंटरचेंजजवळ ही अपघाताची घटना घडली. पुण्यावरून मुलीचे MBA चे अॅडमिशन करून नागपूरला जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. कारमधील चालकासह तिघांचा मृत्यू झाला. तर ट्रॅकमधील चालक आणी क्लीनरचाही अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गांवर रात्री दरम्यान इथेनॉलचा एक ट्रक पलटी झाला होता म्हणून वाहतूक डायवर्ट केली होती. त्यात वाहतूक थांबली असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार ट्रॅकच्या खाली चिरडली गेली आणि ट्रकला आग लागली. ट्रक मिरची घेऊन जात होता. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आणि ट्रक जळून खाक झाला.
या अपघातानंतर मध्यरात्रीपासून समृद्धी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. समृद्धी महामार्ग पोलिस आणि पूलगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिस करत आहेत. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुलगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.