सोयाबीन चोरणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी केला पर्दाफाश | Jamkhed police bust soybean theft gang

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि 15 जानेवारी । आडत दुकानासमोर सोयाबीनच्या 50 पोत्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी पर्दाफाश करत तिघा जणांना बेड्या ठोकण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे.

जामखेड तालुक्यातील जातेगाव येथील फिर्यादी  सुनिल भानुदास गायकवाड यांच्या आडत दुकानावर खरेदी करून ठेवलेल्या सोयाबीन पैकी 50 कट्टे (पोते) सोयाबीनची चोरी झाली होती.  या चोरीत सुमारे 1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल चोरीस गेला होता. ही घटना 28 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे घडली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुरनं. 502/2021 भादवि कलम 379, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

दरम्यान 11 जानेवारी 2022 रोजी हनुमंत बापुराव तांबे वय 27 वर्ष रा. कवडवाडी, महासांगवी ता. पाटोदा जि. बीड,  आण्णा भागवत कोठुळे वय 34 वर्ष रा. जवळाला ता. पाटोदा जि. बीड, झेलसिंग सरदारसिंग टाक वय 39 वर्ष रा. पोलीस कॉलनी शेजारी, पाटोदा ता. पाटोदा जि. बीड  या तिघांना जामखेड पोलिसांनी अटक केली. तर याच प्रकरणातील चौथा आरोपी करणसिंग टाक रा, जालना (फरार) हा फरार आहे.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपीकडे पोलिस कस्टडीमध्ये सखोल चौकशी केली असता आरोपींपैकी हनुमंत तांबे याने गुन्हयातील चोरी केलेले सोयाबीन पाटोदा येथील श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानदार यांना विक्री केलेचे सांगितले. पाटोदा येथील श्रीगणेश ट्रेडर्स या आडत दुकानामधुन 95 हजार रूपये किमतीचे 38 कट्टे सोयाबीन जप्त करण्यात आले आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, डीवायएसपी आण्णासाहेब जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने पार पाडली.

कारवाईच्या पथकात  पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस काँस्टेबल शेषराव म्हस्के, आबा आवारे, विष्णु म्हेत्रे, संदीप आजबे यांचा समावेश होता. पुढील तपास  पोलिस नाईक संभाजी शेंडे हे करत आहेत.