Big Breaking : जामखेडमध्ये माजी नगरसेवकासह तिघांविरोधात सावकारकीचे गुन्हे दाखल !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : Big Breaking | जामखेड  शहरातील तिघा जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात फिर्यादीच्या ताब्यातील तब्बल 01 लाख 90 हजारांचा मुद्देमाल सावकारांनी दहशतीच्या बळावर बळकावला होता. आरोपींमध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे. जामखेडचे   पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी अवैध सावकारकी विरोधात गेल्या काही दिवसांपासून उघडलेल्या मोहिमेला आता यश आले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील अशोक दत्ता बोबडे वय 22 वर्षे याने जामखेड शहरातील सावकाराकडून एक लाख रूपये व्याजाने घेतले होते. सदर पैश्यांची मागणी करण्यासाठी आरोपी हे फिर्यादीला वारंवार त्रास देत होते. दि.15/06/2021 रोजी  ते माहे ऑगस्टपर्यंत या काळात आरोपी हे फिर्यादीच्या घरी पैश्यांची मागणी करण्यासाठी गेले होते.

 

हेही वाचा : गुलाब चक्रीवादळ: महाराष्ट्रात 26 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा

त्यावेळी आरोपींनी फिर्यादीस एक लाख रूपये लगेच देण्याची मागणी केली. फिर्यादीने दोन दिवसांत तुमचे पैसे देतो असे सांगूनही आरोपींनी काही न ऐकता फिर्यादीच्या वडिलांचे नाव असलेला टाटा कंपनीचा छोटा हत्ती नंबर एम एच 16सी. सी. 2239 व फिर्यादीचे नाव असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मॉडेल ची मोटर सायकल एम एच 16सी.आर.9008 यांच्या चाव्या बळजबरीने काढून घेऊन गेले होते.  त्यानंतर फिर्यादीने आरोपीस फिर्यादीचे वरील वाहने परत देण्यासाठी फोन केला असता आरोपीने फिर्यादीचे वाहने विकून टाकल्याचे सांगितले असे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच या प्रकरणातील आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन फिर्यादीच्या आई-वडिलांना तुमचे नाव मतदार यादीत टाकतो असे खोटे बोलून फिर्यादीच्या आई वडिल, भाऊ व फिर्यादीचे आधारकार्ड पॅनकार्डही घेऊन गेले होते. या कागदपत्रांचा दुरूपयोग होऊ शकतो असेही फिर्यादीत म्हटले आहे.

या सावकारांवर दाखल झाले गुन्हे

दरम्यान जामखेड पोलिस स्टेशनला पिंपळगाव आळवा येथील अशोक दत्ता बोबडे वय 22 वर्षे धंदा ड्रायव्हर यांनी फिर्याद दाखल केली आहे.  त्यानुसार जामखेड शहरातील संदीप सुरेश गायकवाड व शेखर बाळू रिटे (दोघे रा. गोरोबा टाकी, जामखेड ) तसेच त्यांच्याबरोबर असलेल्या अन्य एका अनोळखी इसम अश्या तिघा जणांविरोधात गु.र.नं. व कलम 429/2021 भा.द.वि. कलम 327, 34 महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात आरोपींनी फिर्यादीच्या ताब्यातील 01 लाख पन्नास हजार रूपये किमतीचा टाटा कंपनीचा छोटा हत्ती (एम एच 16 सी.सी.2239) व 40 हजार रूपये  किमतीची स्प्लेंडर  मोटरसायकली (एमएच 16 सी आर 9008 असा एकुण 01 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल बळकावला होता. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.

जामखेड तालुक्यात अवैध्य सावकारांचा मोठा सुळसुळाट आहे. सावकारांच्या जाचाच्या कहाण्या भयानक आहेत. पण तालुक्यातील सावकारकीचा समुळ बिमोड कधी होणार याची जनतेला प्रतिक्षा आहे.

 

web tital : Big Breaking Money laundering case filed against both in Jamkhed