नान्नज बाॅम्ब अफवा प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील नान्नज गावात सहा ठिकाणी बाॅम्ब ठेवण्यात आले आहेत, ते कधीही फुटू शकतात, असा फोन करून राज्याच्या पोलिस दलाची झोप उडवून देणाऱ्या माथेफिरूला गजाआड करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shocking information has come to light in the Nannaj bomb rumor case

मुळचा सोलापुर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील रहिवासी असलेल्या दिनेश सुतार या माथेफिरू तरूणाने दोन दिवसांपुर्वी पोलिस दलाच्या मुंबई येथील मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करत जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बालाजी मेडिकलमध्ये सहा बॉम्ब ठेवले आहेत अशी माहिती दिली होती. यानंतर पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ झाली होती. जामखेड पोलिसांनी तातडीने नान्नजला धाव घेतली. संबंधित मेडिकल दुकान आणि परिसराची कसून तपासणी केली. पण हाती काहीच लागले नाही.

दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास अहमदनगर येथील बॉम्बशोधक पथक नान्नजला दाखल झाले. बॉम्बशोधक व बाॅम्ब निकामी करणाऱ्या पथकातील जंजीर या श्वानाने संपूर्ण परिसर पिंजून काढला.परंतू काहीही हाती लागले नाही. यामुळे संबंधित फोन हा अफवा पसरवणारा होता हे स्पष्ट झाले. यामुळे नान्नज ग्रामस्थांसह पोलिस दलाने रविवारी सुटकेचा निश्वा:स टाकला.

एकिकडे पोलिस नान्नजमध्ये बाॅम्ब शोधत असताना दुसरीकडे मुंबई पोलिस फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोधासाठी वेगाने काम करत होती. अखेर सोमवारी दिनेश सुतार नामक व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता संबंधित व्यक्ती हा माथेफिरू असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान ज्या मोबाईल क्रमांकावरून मुंबई नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्याचा फोन गेला होता, तो फोन दिनेश सुतार या व्यक्तीने केला होता, दिनेश सुतारचा याच्याविरोधात रविवार रात्री जामखेड पोलिस ठाण्यात कलम 177, 182, 505 (1)(B) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार शिवाजी भोस यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.

दरम्यान मुंबईच्या एल टी मार्ग पोलिसांनी दिनेश सुतार याच्या मुसक्या आवळत अटक केली आहे. त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया जामखेड पोलिसांनी सुरु केली आहे. उद्या किंवा परवा तो जामखेड पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.

घटनेचे खरे मुळ फेसबुक मैत्रीत

नान्नज बाॅम्ब प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार सांगोल्याच्या दिनेश सुतार या माथेफिरू तरूणाची फेसबुकवरून जामखेड तालुक्यातील एका महिलेशी ओळख झाली होती. त्या महिलेशी फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर दोघांमधील संवाद वाढला होता. परंतू दिनेश हा वेेडसर असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर तीने त्याच्याशी बोलायचं बंद केले होते.

त्यामुळे तो अनेकांना फोन करून संबंधित महिलेला बोलायला लावा असा आग्रह धरायचा. तसेच तिच्याशी संपर्क साधून सतत तो त्रास देत असायचा, या त्रासाला कंटाळून त्या महिलेने त्याच्याविरोधात कलम 354 नुसार जामखेड पोलिस स्टेशनला मागील आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून दिनेश हा वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करायचा. तसाच फोन त्याने पोलिस दलाच्या मुंबई, अहमदनगर नियंत्रण कक्षाला तसेच जामखेड पोलिस स्टेशनला केला आणि सर्वांनाच कामाला लावले. बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवून त्याने राज्यात खळबळ उडवून दिली. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी वेगाने तपास करत त्याच्या मुसक्या आवळल्या आणि घटनेवर पडदा पाडला.

संबंधित तरूण मनोरुग्ण

दिनेश सुतार हा सांगोला तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. तो मनोरुग्ण असून त्याच्यावर मिरज मधील एका रुग्णालयात उपचार केले जात होते. पण तेथून तो गायब झाला. तो सतत वेगवेगळ्या लोकांना फोन करून त्रास देत असल्याची माहिती पुढे येत आहे. एका प्रकरणात तो काही वर्षांपुर्वी जेलमध्ये होता, सध्या तो मुंबईच्या एल टी मार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे.

सोशल मिडीयाचा वापर करताना काळजी घेण्याची गरज

सध्या सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर वाढला आहे. प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनमुळे जग मुठीत आले आहे. आयुष्यात कधी न भेटलेल्या माणसांकडे सोशल मीडियावर मन मोकळे करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोशल मिडीया जितका चांगला तितकाच वाईटचं असतो हे अनेकदा घडणाऱ्या घटनांतून अधोरेखित होत आले आहे. सोशल मिडीयावरील फसवणूकीला महिला सर्वाधिक बळी ठरतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.