विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांची हळगावला भेट, वांझ रोगासंदर्भात तुर पिकांची केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला संवाद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी हे आज 19 सप्टेंबर 2022 रोजी जामखेड तालुका दौर्यावर आले होते. यावेळी त्यांनी जामखेड तालुक्यातील हळगाव येथील तुर पिकातील वांझ रोगासंदर्भात शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या आणि प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली.

वांझ रोगाची कारणे, शेतकरी करत असलेल्या उपाययोजना व भविष्यातील धोके याबाबत त्यांनी शेतकरी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. सद्यस्थितीत अल्प प्रमाणात असणारा वांझ रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
यावेळी कर्जत उपविभागीय कृषी अधिकारी अनिल गवळी,जामखेड तालुका कृषी अधिकारी जामखेड राजेंद्र सुपेकर, श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, कर्जत तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के,मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांच्या उपस्थितीत जामखेड येथे कृषी विभागाच्या कर्जत उपविभागाची बैठक पार पडली. या बैठकीत कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी यांनी हळगाव येथील वांझ रोगग्रस्त तुर पिकांची पाहणी केली. त्यानंतर कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील तुर शेंडा खोडणी प्रात्यक्षिकाची पाहणी केली.