जामखेड पोलिस स्टेशनच्या पुढाकारातून रविवारी हळगावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून जामखेड तालुक्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील हळगाव आणि जामखेड शहरात जामखेड पोलिस दलाच्या वतीने रविवारी 22 मे 2022 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून मागील वर्षीपासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन जामखेड तालुक्यात केले जात आहे.

यावर्षी सुद्धा 1 मे रोजी जामखेड तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान शिबिराचा पहिला टप्पा पार पडला.आता या रक्तदान शिबिराचा दुसरा टप्पा जामखेड शहर व हळगाव येथे दिनांक 22 रोजी पार पडत आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात मिळाला होता दरम्यान मे महिन्यात रमजानचे उपवास सुरू असल्याने मुस्लिम बांधवांना रक्तदान करता आले नव्हते त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या आग्रहाखातर जामखेड शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याच बरोबर हळगाव येथेही रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. हळगाव येथे पार पडत असलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जय श्रीराम साखर कारखान्याचे कर्मचारी तसेच हळगाव आणि हळगाव पंचक्रोशीतील तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे त्यादृष्टीने पोलीस दलाच्या वतीने नियोजन सुरू आहे.

जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने रविवारी हळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरासाठी हळगाव व पंचक्रोशीतील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.