- Advertisement -

जवळा सोसायटीवर कब्जा कुणाचा ? रविवारी होणार फैसला !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जवळा सोसायटीची निवडणूक जामखेड तालुक्यात चर्चेत आहे, या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? कुणाचा सोसायटीवर कब्जा होणार ? याचा फैसला उद्या होणार आहे. या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरूध्द शेतकरी ग्रामविकास पॅनल या दोन गटात काट्याची टक्कर होत आहे.

जवळा सोसायटीची 13 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक होत आहे, 13 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात होते, यातील पाच अपक्षांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दोन्ही पॅनलला पाठिंबा दिला आहे. यातील दोघांनी एका पॅनलला तर तिघांनी एका पॅनलला पाठिंबा दिला. यामुळे दोन्ही पॅनलमध्ये काट्याची टक्कर होत आहे. उद्या 17 रोजी मतदान होणार आहे.तर त्याचदिवशी रात्री लगेच मतमोजणी होणार आहे. यामुळे जवळा सोसायटीवर कब्जा कुणाचा याचा फैसला उद्या होणार आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा हे गाव राजकीयदृष्ट्या सजग गाव आहे, या गावातील अनेक नेत्यांनी तालुक्याचे नेतृत्व केले आहे. सध्या जवळा सोसायटीची निवडणूक पार पडत आहे. स्व लोकनेते श्रीरंगराव कोल्हे आणि स्व लोकनेते प्रदिप (आबा) पाटील यांच्या पश्चात प्रथमच जवळ्यात निवडणूक पार पडत आहे.

या निवडणुकीत दिवंगत नेत्यांचे कौटुंबिक वारसदार दत्तात्रय कोल्हे व दीपक पाटील यांनी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व केले आहे. त्यांना माजी चेअरमन डाॅ महादेव पवार, राजेंद्र पवार (Rd ग्रुप), ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, माजी चेअरमन शहाजी पाटील, प्रशांत पाटील, प्रदिप दळवी, संतराम सुळ, बाबा महारनवर, डाॅ दीपक वाळुंजकर, दशरथ हजारे, गौतम कोल्हे सह आदी सर्वपक्षीय नेत्यांनी साथ दिली आहे.

शेतकरी विकास आघाडीच्या बॅनरवर दिवंगत नेत्यांच्या फोटोशिवाय गावातील किंवा तालुकास्तरीय कुठल्याच नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले नाहीत. शेतकरी विकास आघाडी पतंग चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे.

तर शेतकरी विकास आघाडी विरोधात शेतकरी ग्रामविकास पॅनल निवडणूक लढवत आहे. या पॅनलचे नेतृत्व सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर हे करत आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा पॅनल बनवण्यात आला आहे. या पॅनलने बनवलेल्या बॅनरवर तसा उल्लेख केलेला आहे. तसेच दिवंगत नेत्यांचे फोटो शेतकरी ग्रामविकास पॅनलने बॅनरवर वापरले आहेत.

शेतकरी ग्रामविकास पॅनलमध्ये सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर यांच्या साथीला माजी सभापती सुभाष अव्हाड, जेष्ठ नेते मुरलीधर हजारे, अंगद वाळुंजकर, भानुदास रोडे गुरूजी, आप्पासाहेब मते, विष्णू हजारे गुरूजी, कल्याण रोडे, प्रभाकर वाळुंजकर, बिभीषण लेकुरवाळे, दशरथ कोल्हे, रफिकभाई शेख, बाजीराव खाडे, माऊली देवमुंडे, भाऊसाहेब सुळ, किसन गोयकर, दयानंद कथले, सह आदी नेत्यांची साथ आहे. शेतकरी ग्रामविकास पॅनल कप बशी चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहे.

दरम्यान गेल्या आठवडाभरापासून जवळ्यात सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या होत्या, आज दिवसभर दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेट घेत मतदारांशी संवाद साधला, तसेच मतदान जास्तीत जास्त घडवून आणण्यासाठी दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली. उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

दरम्यान आज कत्तलची रात्र असल्याने दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना आणि नेत्यांना डोळ्यात तेल घालून रात्रभर जागता पाहरा द्यावा लागणार आहे. यामुळे जवळा, मतेवाडी, मुंजेवाडी, खुटेवाडी, गोयकरवाड या भागात दोन्ही पॅनलकडून टाईट फिल्डींग लावण्यात आली आहे.