कोणत्याही दबावाला, आमिषाला बळी न पडता उत्स्फूर्तपणे मतदान करा – शेतकरी विकास आघाडीचे अवाहन !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जवळा सोसायटी निवडणुकीत विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल करण्याबरोबर वेगवेगळे आमिषे दाखवली जात आहेत, परंतू कुठल्याही दबावाला बळी न पडता सभासदांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे असे अवाहन शेतकरी विकास आघाडीचे पॅनलप्रमुख दत्ताभाऊ कोल्हे आणि दीपक पाटील यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीवर आमच्या विचारांची सत्ता आहे, यंदाही जनता आमच्या पाठीशी कायम राहणार आहे, जवळ्यात काष्टी पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यादृष्टीने शेतकरी विकास आघाडीने सर्व तयारी केली आहे.जनतेने पुन्हा काम करण्याची संधी दिल्यास जवळा सोसायटीच्या माध्यमांतून जवळ्यात काष्टी पॅटर्न लागू केला जाईल, यातून सभासदांची आर्थिक प्रगती साधली जाईल. त्यामुळे सभासदांनी विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या अपप्रचाराला बळी न पडता शेतकरी विकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे अवाहन डाॅ महादेव पवार यांनी केले आहे.

जवळा सोसायटी निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे, मतदानाच्या आदल्यादिवशी शेतकरी विकास आघाडीच्या नेत्यांकडून संस्थेच्या सभासदांच्या व्यक्तीगत गाठीभेट घेत मतदानाचे अवाहन केले जात आहे. शेतकरी विकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी दिवसभर उन्हा तान्हात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन सत्ता समीकरणांची गोळाबेरीज साधण्याचा जोरदार प्रयत्न केला.

सोसायटीवर कब्जा मिळवण्यासाठी सरसावलेल्या विरोधकांना जनता योग्य धडा शिकवेल, जनतेला वेठीस धरून सत्ता मिळवण्याचे विरोधकांचे स्वप्न धुळीस मिळतील जनता विकासाला साथ देणार आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. जनतेने विरोधकांच्या आमिषाला बळी पडू नये असे अवाहन अजिनाथ हजारे व शहाजी पाटील यांनी केले आहे.