जामखेड: विंचरणा खोर्‍यातील दमदार पावसाने सिना नदी झाली वाहती, विंचरणा काठच्या गावांनाही मिळाला मोठा दिलासा, खैरी धरणासह इतर प्रकल्प अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । बालाघाट डोंगर रांगेत उगम पावणाऱ्या विंचरणा नदीच्या खोर्‍यात गेल्या दोन तीन दिवसांपासून होत असलेल्या दमदार पावसामुळे जामखेड तालुक्यातील चोंडी येथून वाहणारी सिना वाहती झाली आहे. सिना नदीत पाणी दाखल झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संपुर्ण पावसाळ्यात सिना नदी कोरडीठाक होती. सिना नदी काठच्या गावांसह संपुर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. परंतू आता दुष्काळाचे सावट काहीसे हटले आहे. परंतू अजूनही खैरी प्रकल्पासह इतर प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

jamkhed, Heavy rain in Vincharana valley caused river Sina to flow, villages along Vincharana also got big relief, Khairi Dam and other projects are still waiting for heavy rains,

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी नदी म्हणून सिना नदी ओळखली जाते. या नदीचे उगमस्थान अहमदनगर शहराजवळ आहे. वरच्या भागात दमदार पाऊस झाल्यास सिना नदीला पाणी येते. परंतू गेल्या काही वर्षांत सिना नदीच्या खोऱ्यात पावसाची मोठ्या प्रमाणात तुट होत आहे. याचा फटका सिना खोर्‍याला मोठ्या प्रमाणावर बसत आहे. सिना नदीला कधीतरीच पाणी येते. परंतू सिना नदीला ज्या उपनद्या येऊन मिळतात त्या नद्यांच्या खोर्‍यात दमदार पाऊस झाल्यास सिना नदी अधुनमधून वाहती होते. गेल्या काही वर्षांत सिना आणि तिच्या उपनद्यांच्या खोर्‍यात पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे.

jamkhed, Heavy rain in Vincharana valley caused river Sina to flow, villages along Vincharana also got big relief, Khairi Dam and other projects are still waiting for heavy rains,

यंदाच्या पावसाळ्यातही सिना व तिच्या उपनद्यांच्या खोर्‍यात पावसाने दडी मारली. त्यामुळे जामखेड तालुक्यातून वाहणारी सिना नदी संपुर्ण पावसाळ्यात कोरडीठाक होती. मात्र सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सिना नदीची उपनदी असलेल्या विंचरणा नदीच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाल्याने विंचरणा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले.श्री क्षेत्र रामेश्वर भागात गेल्या दोन तीन दिवसांपासून दमदार पाऊस झाला. याचा फायदा जामखेड तालुक्यातील काही भागांना झाला आहे.

jamkhed, Heavy rain in Vincharana valley caused river Sina to flow, villages along Vincharana also got big relief, Khairi Dam and other projects are still waiting for heavy rains,

विंचरणा नदीवरील पाटोदा तालुक्यातील सर्व तलाव भरल्यानंतर जामखेड तालुक्यातील भूतवडा – भूतवडा जोडतलाव व काझेवाडी हे मोठे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. यामुळे विंचरणा नदी वाहती झाली. सिना व विंचरणा या दोन्ही नद्यांचा गिरवली येथे संगम होता. या ठिकाणी विंचरणा नदीचे पाणी सिना नदीत दाखल झाले. गणेश विसर्जनाच्या दिवशी चोंडीतून वाहणाऱ्या सिना नदी वाहती झाली. सिना व विंचरणा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने दोन्ही नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

jamkhed, Heavy rain in Vincharana valley caused river Sina to flow, villages along Vincharana also got big relief, Khairi Dam and other projects are still waiting for heavy rains,

सध्या चोंडीतून वाहणाऱ्या सिना नदीत पाणी दाखल होत आहे. सिना व विंचरणा खोरे तसेच बालाघाट डोंगर रांगेच्या खोर्‍यात पुढील दोन तीन दिवस दमदार पाऊस झाल्यास सिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकते. याचा फायदा चोंडीसह, आघी, दिघी, जवळा, या भागालाही होऊ शकतो. सिना नदीवरील बंधारे भरली जावू शकतात. तसेच विंचरणा नदी वाहत असल्याने जामखेड शहर, कुसडगाव, रत्नापुर, सांगवी, फक्राबाद, धानोरा, वंजारवाडी, पिंपरखेड, हसनाबाद, गिरवली, या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. अजून दमदार पाऊस झाल्यास या भागातील बंधारे पुर्ण क्षमतेने भरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

खैरी प्रकल्पासह इतर प्रकल्प दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

दरम्यान, जामखेड शहराजवळील भूतवडा, भुतवडा जोडतलाव, व काझेवाडी हे तीन तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. परंतू जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प असलेले खैरी धरण अजूनही भरलेले नाही. खैरी धरणात आज 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपार अखेर अवघा सात टक्के पाणीसाठा झालेला आहे. आज दुपारी खैरीच्या पाणलोट क्षेत्रात दीड तास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खैरी धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. अजून दोन चार दिवस पाणलोट क्षेत्रात असाच दमदार पाऊस होत राहिल्यास खैरी धरणासह इतर तलावही भरली जातील, अशी माहिती खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी दिली.

जामखेड तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यात गंभीर दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू गेल्या तीन चार दिवसांत काही भागात चांगला पाऊस झाला. परंतू या पावसाचा जामखेड तालुक्यातील बहुतांश जलसाठ्यांना अजूनही मोठा फायदा झालेला नाही.मोहरी तलाव 50 टक्के भरत आला आहे. तर इतर छोट्या मोठ्या तलावांच्या पाणीसाठ्याची स्थिती नाजूक आहे. आज अखेर भूतवडा, भूतवडा जोड तलाव, काझेवाडी व खैरी धरण वगळता इतर तलावांमध्ये किती पाणी साठा आहे याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

सध्या पडत असलेला पाऊस असाच पुढील तीन चार दिवस पडत राहिला, पाण्याची नव्याने आवक वाढू लागली तर तालुक्यातील जलसाठ्यांचे चित्र बदलू शकते. विंचरणा, खैरी सह इतर नद्यांच्या पाणलोट क्षेत्रासह जामखेड तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस व्हावा, अशी आशा तालुक्यातील बळीराजाला आहे.