विजेचा खांब कोसळून एक घोडा ठार तर एकाचे प्राण वाचले

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथे विजेचा खांब कोसळून एक घोडा ठार होण्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजता घडली.घोडा मालक सचिन शेख यांच्यावर काळ आला होता परंतू वेळ आली नसल्याने त्यांचे प्राण वाचले.

हळगाव येथिल सचिन सजन शेख हे घोडा घेऊन जवळा रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाच्या तानाला घोडा चिकटला,त्यानंतर घोडा तानावर पडला असता पोल त्याच्या अंगावर कोसळला, या घटनेत विजेच्या तारा घोडाच्या अंगाला गुंडाळल्या जाऊन तो जाग्यावरच गतप्राण झाला.

घोड्याला वाचवण्यासाठी सचिन शेख यांनी प्रयत्न केला असता तेही चिकटले होते. त्यानंतर नाना नामदेव ढवळे यांनी प्रसंगावधान राखत विज रोहित्र बंद केले. त्यामुळे सचिन शेख यांचे प्राण वाचले. या घटनेत सचिन शेख किरकोळ जखमी झाले, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, त्यानंतर गावातील काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती प्रशासनाला कळवली. घटना घडून तीन तास उलटून गेल्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर पंचनामा सुरू केला.

या घटनेत जो विजेचा खांब कोसळून घोडा ठार झाला आहे. तो खांब कमकुवत होता, संबंधित खांब बदलावा यासाठी काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी वायरमनकडे तोंडी तक्रार केली होती. परंतू त्याची तातडीने दखल घेतली असती तर आजची दुर्दैवी घटना टळली असती.

दरम्यान या घटनेत सचिन शेख या शेतकऱ्याचे तब्बल दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जेष्ठ नेते किसनराव ढवळे, उपसरपंच आबासाहेब ढवळे, राजू भैय्या सय्यद, हसन शेख, ग्रामपंचायत सदस्य रामदास शिंदे,पोलिस पाटील सुरेश ढवळे सह आदींनी भेट दिली.