जामखेड तालुक्यात पावसाची दमदार हजेरी, अनेक नद्यांना पुरसदृश्य स्थिती, खैरी मध्यम प्रकल्पासह सर्व लहान मोठे तलाव ओव्हर फ्लो, अनेक भागात शेती पिकांचे नुकसान !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यात शुक्रवारी रात्री व शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे सीना, विंचरणा, नांदणी, खैरी सह आदी प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे काही भागातील पुल पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी रात्रभर झालेल्या दमदार पावसामुळे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प अशी ओळख असलेला खैरी मध्यम प्रकल्प आज (२४ रोजी ) सकाळी ८ वाजून १० मिनीटांनी ओव्हर फ्लो झाला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे खैरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत धरणातून ६६२ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु असल्याची माहिती खैरी प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश काळे यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यात शुक्रवारी सायंकाळपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली. संपुर्ण रात्रभर जोरदार पाऊस कोसळत होता. शनिवारी पहाटे अनेक भागांना पावसाने झोडपले. बालाघाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. या भागात झालेल्या पावसामुळे विंचरणा व खैरी सह आदी मोठ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी (पूर ) आले. त्याच बरोबर सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सीना नदी दुथडी भरून वाहत आहे.
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेला खैरी मध्यम प्रकल्प आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ०८ वाजून १० मिनिटांनी शंभर टक्के भरला. धरणाची पाणी पातळी ५६२.३८ मिटर इतकी झाली आहे. धरणातून ६६२ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणाच्या विसर्गात आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान जामखेड शहराला पाणी पुरवठा करणारा भूतवडा तलाव मागील महिन्यातच भरला आहे. तालुक्यातील लहान मोठे सर्व तलाव ओसंडून वाहत आहेत.
बालाघाट डोंगर रांगेच्या परिसरात येणाऱ्या जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या भागातील पिके मोठ्या प्रमाणात वाया गेली आहेत. पावसामुळे अनेक भागातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे हाती घेतले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शुक्रवारी रात्रभर झालेल्या पावसामुळे साकत भागातील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येथील नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. सदरचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे विंचरणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने धानोरा – फक्राबाद व कवडगाव – गिरवली येथील पूल पाण्याखाली गेला होता. बांधखडक येथील नदीला पूरआल्याने या परिसराचा काही काळ संपर्क तुटला होता. बांधखडक येथील नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. जवळा येथील नांदणी नदीवरील 11 बंधारे ओसंडून वाहत आहेत. जामखेड तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
जामखेड तालुक्यात शुक्रवारी रात्री खर्डा मंडळात सर्वाधिक ७९.३ मिलीमीटर तर नान्नज मंडळात ७२ मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय अरणगाव मंडळात ५९.८, नायगाव मंडळात ५०.५ तर जामखेड मंडळात ७२ मिलीमीटर पाऊस झाला.या पावसामुळे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प अशी ओळख असलेल्या खैरी धरण शनिवारी (२४ रोजी ) सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. दुपारी. १२ वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी. ५६२.३८ मिटर इतकी झाली होती. धरणात एकूण ५३३.६० द.ल.घ.फु. इतका पाणी साठ झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात ६६२ क्युसेक्स इतका विसर्ग दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु होता. पाऊस आणखी सुरु राहिल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.
साकत परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास
शनिवारी सकाळपासून जामखेड तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार आज सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. जामखेड तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या गावांना याचा मोठा धोका होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क राहावे. आपल्या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. पाण्याचा वाहता प्रवाह ओलांडू नये, नदी, ओढे, नाले या काठाच्या नागरिकांनी पूरापासून सावध राहावे असे आवाहन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांनी केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे साकत परिसरातील नदी, ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अनेक वाड्या व वस्त्यांचा संपर्क तुटला होता. तसेच शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पीके पाण्याखाली गेले आहेत. साकत कोल्हेवाडी कडभनवाडी जोडणारा लेंडी नदीवर असलेला पुल आज झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेला यामुळे लोकांचा संपर्क तुटला होता सकाळी सात नंतर पाणी ओसरल्यावर वाहतूक सुरू झाली. शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोजच प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी व परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
परिसरात जून महिन्यांपासून पाऊस आहे. पेरणी जून मध्ये पेरणी झाली पण जूनपासून रोजच पाऊस आहे. फक्त आठ दिवस पावसाने खंड दिला. परत पाऊस सुरू झाला रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे लेंडी नदीला पुर आल्यामुळे संपर्क तुटला होता. सकाळी पाणी थोडे कमी झाल्याने वाहतूक सुरू झाली शालेय विद्यार्थ्यांना दररोजच जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे तसेच परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशीही मागणी होत आहे.
सध्या जामखेड सौताडा महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यातच सौताडा जवळील पूल काही दिवसांपूर्वी वाहून गेला होता. तसेच रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्ता वाहतुकीस योग्य नाही त्यामुळे अनेक वाहनधारक तसेच बीड, पाथर्डी कडे जाणारे वाहने पिंपळवाडी मार्गी वांजरा फाटा मार्गी जातात यात अनेक बस पण याच मार्गी जातात पण आता पुल खचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तसेच साकत कोल्हेवाडी कडभनवाडी यांना जोडणारा लेंडी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला होता.
साकत कोल्हेवाडी मार्गावर साकत जवळ पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वराट वस्ती, कडभनवाडी या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. लेंडी नदी व वांजरा नदीला पुर आल्यामुळे अनेक ठिकाणचा संपर्क तुटला होता. सकाळी पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
आज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला यामुळे नदीला पूर आला होता यातच साकत जवळील लेंडी नदीवर पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शालेय विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होत आहे.
आज पहाटे झालेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता यातच कडभनवाडी, कोल्हेवाडी, वराट वस्ती, कवडवाडी परिसरातील नागरिक यांचा संपर्क तुटला होता. अनेक दुधवाले व विद्यार्थी अडकले होते. सकाळी पाणी कमी झाल्यावर वाहतूक सुरू झाली. काही विद्यार्थी परत माघारी गेले यामुळे पाऊस झाला की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ताबडतोब पुलाची उंची वाढवावी व परिसरातील पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे.
अहमदनगर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा
पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा ईशारा देण्यात आला आहे. खडकवासला, घोड व इतर धरणातुन विसर्ग सुरु असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील भीमा व घोड नदी तसेच कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदुर मधमेश्वर धरणातुन गोदावरी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरु असुन नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीतील विसर्गामध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे कोपरगाव, राहाता, श्रीरामपुर व नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीकाठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झालेली असून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ झालेली आहे. निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून संततधार पाऊस वा अतिवृष्टी झाल्यास विसर्गामध्ये वाढ होऊ शकते.पर्यायाने ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा नदीच्या विसर्गात वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.