आमदार आपल्या दारी कार्यक्रमात तक्रारींचा पाऊस 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील सर्व गावांसाठी  हळगाव येथे 27 रोजी ‘आमदार आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रोहित पवार व महसुल, पोलिस, कृषी, पंचायत समिती, महावितरण सह आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी अक्षरशा: तक्रारींचा पाऊस पडला.

हळगाव येथील दत्त देवस्थानच्या प्रांगणात आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप दादा महाराज रंधवे यांनी आमदार रोहित पवार यांचे स्वागत केले.जवळा जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील गावकारभारी व नागरिक आपापल्या समस्या घेऊन आले होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्यांचा निपटारा केला. महावितरण विरोधात सर्वाधिक तक्रारी आल्या होत्या.

कर्जत – जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने 15 भगिनींना शिलाई मशीन व पिठाची गिरणीचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शेततळ्याच्या रखडलेल्या अनुदानाचे चेकही यावेळी हळगावच्या शेतकऱ्यांना देण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती सूर्यकांत मोरे, जेष्ठ नेते किसनराव ढवळे, सरपंच अनिता ढवळे, कृषी अधिकारी अशोक शेळके, युवकचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, सह आदी उपस्थित होते.