राजुरी ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सारोळ्यात सत्कार !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा ।  जामखेड तालुक्यात गाजलेल्या राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवत नवा इतिहास रचला. या निवडणुकीत 9 पैकी 5 जागा जिंकत भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावला आणि राजुरीत दमदार एन्ट्री केली.भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल भाजपचे तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशिद यांनी राजुरी ग्रामपंचायतमधील भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करत त्यांचा सत्कार केला.

felicitation of newly elected members of BJP elected in Rajuri Gram Panchayat

राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे पाच सदस्य निवडून आले आहेत. बुधवारी सारोळा येथे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशिद यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला. राजुरी गाव राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला होता. येथील राष्ट्रवादीच्या 200 कार्यकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात प्रवेश केला होता. हा प्रवेश खूप गाजला होता.

राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी असा थेट सामना रंगला होता. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली, पहिल्याच प्रयत्नात बहुमत मिळाले, पण सरपंचपदाच्या निकालाने हुलकावणी दिली. परंतू या निवडणुकीत मिळालेले यश भाजपला या भागात बळकटी देणारे ठरले आहे.

भाजपचे तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशिद यांनी राजुरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य संभाजी कोल्हे, गौतम फुंदे, विशाल चव्हाण, सुरज गायकवाड आणि बाळू मोरे यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक करत पक्षाच्या आणि सारोळा ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी आप्पासाहेब ढगे आणि पप्पू काशिद सह आदी मान्यवर उपस्थित होते.