जामखेड तालुक्यात 86.37 टक्के मतदान, उद्या निकाल, जवळा ग्रामपंचायतवर कोणाचा झेंडा ? उत्सुकता शिगेला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील जवळा, मतेवाडी आणि मुंजेवाडी या तीन ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जामखेड तालुक्यात 86.37 टक्के मतदान झाले. यामध्ये जवळा ग्रामपंचायतसाठी 85.41 टक्के, मुंजेवाडी 90.64 तर मतेवाडीत 89.21 टक्के मतदान झाले. उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे, अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

86.37 percent voting in Jamkhed taluka, results tomorrow, whose flag will be on jawala Gram Panchayat? Curious,

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले होते. येथील निवडणुकीत प्रशांत शिंदे विरूध्द सर्वपक्षीय नेते असा सामना झाला. सत्ताधारी जवळा ग्रामविकास पॅनल विरूध्द शेतकरी ग्रामविकास आघाडी अशी लढत झाली. या निवडणुकीत सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ज्योती क्रांतीचे चेअरमन अजिनाथ हजारे, कोल्हे गटाचे नेते दत्ताभाऊ कोल्हे, माजी सभापती सुभाष अव्हाड, माजी उपसभापती दिपक पाटील, जवळा सोसायटीचे चेअरमन शहाजी पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डाॅ महादेव पवार, दळवी गटाचे नेते प्रदिप दळवी, दशरथ हजारे गुरूजी, उमेश रोडे, गौतम कोल्हे, सह आदी दिग्गज नेत्यांनी आपल्या प्रतिष्ठा पणाला लावत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. येथील निवडणुकीसाठी एकुण 5183 मतदार मतदानास पात्र होते. यापैकी 4427 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. जनतेतून सरपंचपदासह 15 सदस्यपदांच्या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला मतपेटीत बंद झाला. उद्या सोमवारी निकाल आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. जवळा ग्रामपंचायतवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जवळा ग्रामपंचायतचा निकाल काय लागणार याकडे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

जवळा, मतेवाडी, मुंजेवाडी येथील निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश पाटील व त्याच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता. तीनही गावात शांततामय वातावरणात मतदान पार पडले.