जामखेडमध्ये भीषण अग्नीतांडव; नगररोडवरील आनंद कुशन आगीच्या भक्ष्यस्थानी,अनेक दुकाने आगीच्या कवेत ? परिसरात घबराट
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी घटना समोर आली आहे. शहरातील गजबजलेल्या नगररोड परिसरातील एका कुशनच्या दुकानाला आज रात्री अचानक भीषण आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या आगीने शेजारील दुकानांना आपल्या कवेत घेतले आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून आग विझवण्यासाठी शर्थाने प्रयत्न सुरु आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नगररोडवरील आनंद कुशन या दुकानातून रात्रीच्या सुमारास अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही क्षणांतच आगीच्या उंचच उंच ज्वाला भडकू लागल्या. दुकानात ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर असल्याने आगीने अल्पावधीतच संपूर्ण दुकानाला कवेत घेतले. आगीचे रौद्ररूप इतके भीषण होते की लांबूनही आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट स्पष्ट दिसत होते. यामुळे शहरात घबराट पसरली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, परिसरातील व्यावसायिक आणि तरुणांनी आग विझवण्यासाठी धावपळ सुरू केली. जामखेड नगरपरिषदेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला पण आगीच्या भीषणतेपुढे तो तोडका पडला. आष्टी येथून अग्निशमन बंब मागवण्यात आला. आगीने आजूबाजूच्या अनेक दुकानांना आपल्या कवेत घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
निवासी भागात आग पसरू नये यासाठी खाजगी टँकर मागवून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, आग नेमकी कश्यामुळे लागली ? याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.