संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा, राजकीय वर्तुळात उमटू लागल्या तीव्र प्रतिक्रिया

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने आज सकाळी धाड टाकली आहे. राऊत आणि कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई असल्याचे बोलले जात आहे. राऊतांवरील कारवाईचा सर्वाधिक आनंद शिंदे गटाला झाला आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असल्याच्या कारवाईचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. राजकीय नेत्यांच्या तीव्र  प्रतिक्रिया उमटत आहेत.

संजय राऊत कोणाला घाबरत नाहीत. ते ईडीला सामोरे जातील, संजय राऊतांनी भ्रष्टाचार केला नसेल तर मग कशाला घाबरायचं. त्यांनी बाळासाहेबांऐवजी शरद पवारांची शपथ घ्यायला हवी होती, असा टोला जेष्ठ नेते रामदास कदम यांनी लगावला आहे.

कदम पुढे म्हणाले की, निधी वाटपात अन्याय होत असताना राऊत का नाही बोलले. सेना संपली तरी चालेल पण राष्ट्रवादीवर नाही बोलणार, असं त्यांनी ठरवलं. शिवसेना फोडण्याचं आणि संपवण्याचं काम संजय राऊत तुम्हीच केलं.पत्राचाळीचा हजार कोटींचा घोटाळा आहे. याची चौकशी व्हावी अशी मागणी यापूर्वी केली होती. यात गोरेगावचा आमचाही एक नेता होता. उद्धव साहेबांच्या भोवती कोण बडवे आहेत, गद्दार कोण आहेत, हे माहिती आहे. संजय राऊत शिवसैनिक नाहीत तर पवारांचे आहेत, असंही ते म्हणाले. संजय राऊतांनी शिवसेना सोडून अन्य कुणाची भांडी घासू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

ईडीची मोठी धाड पडते तेव्हा अटक होण्याची शक्यता जास्त  – संजय शिरसाट

तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनी राऊतांवरील कारवाई ही आनंदाची बातमी असल्याचे म्हणत आनंद व्यक्त केला आहे. “ईडीची एवढीमोठी धाड पडते तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता जास्त आहे. शिवसैनिक आज आनंदी झाला आहे. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली, महाराष्ट्राला त्रास झालाय, शिवसेनेचे ४० आमदार १२ खासदार गेले ते सर्व आज आनंदी आहेत, शिवसैनिक आनंदी आहेत. ते काही मास लीडर नाही, प्रवक्ते आहेत. त्यामुळे काही मोठा उठाव होईल असं वगैरे वाटत नाही,” असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ईडी घरी आली की सोबत घेऊनच जाते – अतुल भातखळकर

भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ बोंबाबोंब करा हो, पण तिथे भगवा झेंडा नाचवू नका. हा छत्रपती शिवरायांचा भगवा आहे. भगव्याचा इतका अपमान कुणी केला नसेल. कोविड काळात महाराष्ट्रात केलेला भ्रष्टाचार शिवसेना नेत्यांना पचणार नाही. तुरुंगात तर जावेच लागेल. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नाही तर मग ५५ लाख रुपये परत का केले? अलिबाग मध्ये जमिनी कुठून आल्या?’ असे सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

करेक्ट कार्यक्रम सुरू झाला आहे आणि इथे शिवीगाळ करून उपयोग ही नाही. ईडीचे अधिकारी ट्विटर वाचत नाहीत आणि पुरेसे कागदोपत्री पुरावे असल्याशिवाय घरी येत नाहीत. घरी आले की सोबत घेऊनच जातात. घेऊन गेले की लवकर सोडत नाहीत,’ अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

गेल्या 70 वर्षात कधीच असे झाले नाही – खासदार इम्तियाज जलील

आम्ही पहिल्यापासून सांगतोय संजय राऊत असू द्या की आणखी कुणी असू द्या, भारतीय जनता पार्टी जेव्हा सत्तेमध्ये आली त्यांनी सर्वात आधी देशातील सर्व तपास यंत्रणा आपल्या हातात घेण्याचे काम केले. गेल्या 70 वर्षात कधीच असे झाले नाही. आपला राजकीय अंजेडा राबवण्यासाठी तपास यंत्रणाचा वापर केला जात आहे. आम्हाला माहित आहे ईडीचा वापर सरकार करत आहे आणि त्याचाच दुरुपयोग केला जात असल्याच्या घटनेची आम्ही निंदा करत असल्याचं खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

अजित पवारांची सावध भूमिका

या यंत्रणांना तपासाचा अधिकार आहे, त्यानुसार ते तपास करतायत. सगळ्या विविध विभागांमध्ये तक्रारी आल्या तर चौकशीचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत आहे. आता हे नक्की काय झालंय, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे का येतात, ते अधिकारवाणीने राऊतच सांगू शकतात. मी तुम्हाला सांगितलं की या यंत्रणांना देशातल्या कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे अशी सावध प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

मरेन पण शरण जाणार नाही – संजय राऊत

ईडीचे दहा अधिकारी संजय राऊत यांच्या घरी पोहोचले असून त्यांची घरातच चौकशी सुरू आहे. या चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी काही टिवट केले आहेत. ‘कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.’, असे ट्विट त्यांनी केले आहे. त्या आधी त्यांनी ‘खोटी कारवाई, खोटे पुरावे… मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. जय महाराष्ट्र’, असेही ट्विट केले आहे.