जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष अडचणीत सापडला आहे. शिंदे गटात 50 आमदार सहभागी झाले आहेत. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आक्रमक झालेली असतानाच रविवारी शिवसेनेला धक्का देणारी आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. आता यात आणखीन एका नावाची भर पडली आहे. सकाळपासून नाॅट रिचेबल असलेले शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे सुरतमार्गे गुवाहटीत दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत ANI वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
बंडखोरांच्या गटात सामील होणारे उदय सामंत हे आठवे मंत्री ठरले आहे. सामंत यांच्यापुर्वी शंभूराज देसाई, अब्दुल सत्तार, संदिपान भूमरे, दादा भूसे, एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू हे आधीच बंडखोर गटात दाखल आहेत.
मी पक्ष जोडणारा आहे, तोडणारा नाही. मला वाटतं की, जे आपल्यापासून दूर गेले, त्यांच्याशी चर्चा करायला हवी. हे माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट निर्माण केला, म्हणजे त्यांचे मत बदललं असं नाही असं उदय सामंत म्हणाले होते. त्यामुळे उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गेलेत की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेत याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
बंडखोर आमदारांना केंद्राचे सुरक्षा कवच
बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आक्रमक शिवसैनिक आमदारांच्या घराबाहेर अंदोलन करु लागले आहेत. अश्यातच केंद्र सरकारकडून शिवसेनेच्या काही बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा कवच दिले आहे.