अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 20 हजार रुग्णांची प्राथमिक आरोग्य तपासणी, कर्जत – जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांचा उपक्रम

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीराचा तब्बल 20 हजार नागरिकांनी लाभ घेतला.

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 20 जुलै ते 26 जुलै दरम्यान मोफत जनरल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कर्जत जामखेडमधील शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यात आपला सहभाग नोंदवला. या शिबिरादरम्यान तब्बल 20 हजार रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आयोजित सात दिवसीय आरोग्य शिबिराला पुण्यातील नामांकित डी.वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, भारतीय संस्कृती महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले. दोन्ही तालुक्यातील एकूण 228 गावे व वाड्या वस्त्यांवर जाऊन हे शिबिर राबवले गेले.

या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणीसह अँजियोओप्लास्टी, अँजिओग्राफी तसेच बायपास यासारख्या सर्जरीसाठी चेकअप करून नाव नोंदणी करून घेण्यात आली. तसेच तिरळेपणा, मोतीबिंदू यांसारखे आजार व वंध्यत्व, महिलांचे आजार, ओठ फाटणे तसेच दुभंगलेले ओठ या समस्या असलेल्या नागरिकांच्याही नोंदणी करून घेण्यात आल्या. त्यांच्यासाठी लवकरच सुपर स्पेशालिटी कॅम्पचे आयोजन करून पुढील उपचार केले जाणार आहेत.