वादग्रस्त वक्तव्यामुळे शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, छत्रपती संभाजीराजे, सह आदी नेत्यांनी राज्यपालांना धु धु धुतले

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाण्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, छत्रपती संभाजीराजे यासह आदी नेत्यांनी राज्यपालांचा जोरदार समाचार घेतला आहे. त्याचबरोबर सोशल मिडीयावर नेटकर्यांकडून राज्यपालांंवर जोरदार टीका होत आहे. 

मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं.मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातून जोरदार टीका होऊ लागली आहे.

त्यांच्या डोक्यावरच्या टोपीचा आणि अंत:करणाचा रंग यात काहीही फरक – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी देखील भगत सिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. राज्यपालांबद्दल काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. त्यांच्याबद्दल काही बोलायचं हे सांगणं कठीण आहे. महाराष्ट्र किंवा मुंबई सर्व जातीचे-धर्माचे लोकांना घेऊन जाणारे राज्य आणि शहर आहे. मुंबईची प्रगती ही सर्व सामान्य माणासांच्या कष्टातून झाली आहे, असं शरद पवार म्हणाले.राज्यपालांनी अशा प्रकारची विधानं करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाहीय. मी त्याच्या फार खोलात जात नाही, कारण त्यांच्या डोक्यावरच्या टोपीचा आणि त्यांच्या अंत:करणाचा रंग, यात काहीही फरक नसल्याचं म्हणत शरद पवारांनी टीका केली आहे. तसेच याआधी देखील राज्यपालांनी सावित्राबाई फुले यांच्याबद्दलही एक भयानक विधान केलं होतं, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे – उध्दव ठाकरे

“महाराष्ट्राची काही खाद्य संस्कृती आहे, हे सगळे त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये पाहिलेले असेलच. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी पहिल्या असतील. महाराष्ट्राचा धीर देखील त्यांनी पाहिला आहे. पण कोल्हापूरचा जोडा त्यांनी पाहिला नाही.कोल्हापूरी वाहन, जो जोडा आहे तो सुद्धा त्यांना कोणीतरी दाखवण्याची गरज आहे कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.पण कोल्हापुरी वाहणा कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहेत. आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधी माणसं कष्टाने वर येतात. हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापूरचा जोडा म्हणालेलो आहे. त्या जोड्याचा बाकी उपयोग काय आहे? कोण कसा करेल? कारण त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडा सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे.” असा घणाघात ठाकरे यांनी केला.

राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन  – छगन भूजबळ

गुजरात आणि राजस्थानमध्ये मुळात व्यापारी समाज आहे. राजस्थानमध्येही काही भागात वाळवंटच आहे. ते लोक बाहेर पडलेले आहेत. बिर्लांचा इतिहास पाहिला, तर ते राजस्थानमधून कलकत्याला गेले. मुंबईतही ही सगळी मंडळी आली आणि हे महत्त्व वाढलं. पण मुंबईच्या मराठी माणसांचे कष्ट विसरता येत नाही.मुंबईत नाशिकमधून पाणी, पुण्यातून भाजीपाला, वीज राज्यभरातून जाते. त्यामुळे ती नसेल तर काय होईल, असा प्रश्न विचारता येईल.

अहमदाबादमध्ये ज्या वेळेला 60-70 कापड गिरण्या होत्या वेळेला मुंबईतही 64 गिरण्या होत्या. मुंबईचं हवामान हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र असल्यामुळे थंड आणि गरम असं तीव्र वातावरण नसतं. दिल्लीसारखं हवेचं प्रदुषण नसतं. एका बाजूनी हवा आली की दुसऱ्या बाजूने निघून जाते. मुंबईची बंदरं, विमानतळं, बॉलिवूडचं महत्त्वही खूप आहे. यात फक्त गुजरात आणि राजस्थानचे लोक नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी केलेलं वक्तव्य तर्कहीन असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.

महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा राज्यपाल नेमा : छत्रपती संभाजीराजे

विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत त्यामुळे, देशाच्या राष्ट्रपती महोदया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा अशी मागणी छत्रपती संभाजी महाराजांनी केली आहे.

मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो – राज ठाकरे

आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो असे पत्र लिहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचं विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचं मुंबईसाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असतं. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचं श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.