- Advertisement -

घुलेंच्या मैदानात पवार, शिंदेंची तुफान बॅटींग  : पैलवान चषक ठरतोय स्थानिक राजकारणाचा केंद्र-बिंदू 

डॉ अफरोजखान पठाण । कर्जत ।  कर्जतच्या स्थानिक राजकारणात  सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. मध्यंतरी उठलेले पक्षांतराचे वादळ निवळत असतानाच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त “पैलवान चषक” क्रिकेटच्या स्पर्धेत दररोज वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी हजेरी लावत आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. घुले बंधूचे क्रिकेट मैदान कर्जतच्या स्थानिक राजकारणाचे केंद्र बिंदू ठरू लागले आहे. पवार व शिंदे यांची या मैदानाला भेट व फटकेबाजी पुन्हा एकदा धुराळा उडवून देणारी ठरली आहे.

कर्जत येथील पै प्रवीण घुले मित्रमंडळ च्यावतीने प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उदघाटनास नुकतेच भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नामदेव राऊत यांच्या मातोश्री भामाबाई राऊत यांच्या हस्ते करीत घुले बंधू राजकारणात काही तरी चमत्कार घडवतील अशी चर्चा स्थानिक राजकारणात सुरू झाली होती. यावेळी मातोश्री भामाबाई राऊत यांनी घुले बंधूच्या क्रिकेट मैदानावर बॅटींग करीत त्यास आशीर्वादरुपी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सोमवारी  कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ रोहित पवार कर्जत तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी पैलवान चषकामध्ये हजेरी लावत त्यांनी आयोजन केलेल्या स्पर्धेचे कौतुक करीत मैदानावर फलंदाजी करीत फटकेबाजी केली. आणि प्रवीण घुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी मंत्री राम शिंदे मंगळवारी दुकानाच्या उदघाटन प्रसंगी कर्जत शहरात होते. या कार्यक्रमात प्रवीण घुले, सचिन घुले दोन्ही बंधू देखील उपस्थित होते. लगतच पैलवान चषक स्पर्धा असलेले क्रिकेट मैदान असल्याने राम शिंदे यांनी या स्पर्धेला भेट दिली छोटेखानी भाषण करीत शिंदे यांनी मैदानातच केक कापून घुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राम शिंदे  फलंदाजीसाठी मैदानात उतरले. दोन चेंडू सीमापार धाडले. उपस्थितीतांचे मने जिंकले आणि पुढील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले.

घुले बंधूच्या क्रिकेट मैदानात सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी हजेरी लावत त्यांच्यावरील स्नेह दाखवत असताना राजकीय भाष्य करीत आगामी काळात घुले बंधूच्या राजकीय भूमिका आणि समिकरणावर कर्जतचे स्थानिक राजकारण फिरणार याची प्रचिती दिली आहे. प्रवीण घुलेच्या वाढदिवसा निमित्तआयोजित केलेला “पैलवान चषक” कर्जतच्या स्थानिक राजकारणाचा मात्र केंद्र-बिंदू ठरणार हे नक्की.

हरला तरी पुढील वेळेस जिंकायची ईर्ष्या याच मैदानातून घ्यायची – राम शिंदे

पैलवान चषक क्रिकेट स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव आणि चालना देण्यासाठी आयोजित केली असून अशा स्पर्धेने शारीरिक स्वास्थ्य देखील उत्तम राहण्यास मदत मिळते. स्पर्धेला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली आहे. त्यामुळे प्रवीण घुलेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. पैलवान असल्याने कुस्ती कशी करायची ? आणि कधी कोणता डाव टाकायचा ते जाणून आहेत. ज्यांना त्यांचा वाढदिवस पाहवत नाही त्यांना देखील त्यांनी यु ट्यूबच्या माध्यमातून सामने पाहण्याची संधी उपलब्ध केली आहे. मी आज आलो असल्याने आपली अडचण नाही असे म्हणत नेमका कोणाला राजकीय टोला मारला ते उमगले नाही. जे जिंकतील त्यांना शुभेच्छा आणि जे हारतील त्यांना पुढील विजयासाठी शुभेच्छा. कारण हारायचे कुणीच नाही. एकदा हरलो तरी पुढील वेळेस जिंकायची ईर्ष्या याच मैदानातून घ्यायची.

पैलवान चषक ग्रामीण खेळाडूसाठी उत्तम संधी – आ रोहित पवार

पैलवान चषक ग्रामीण खेळाडूसाठी उत्तम संधी असून या आयोजनात सर्वच विभागात व्यावसायिक पद्धतीने मांडणी केल्याने याचा लाभ भविष्यात खेळाडूना होणार आहे. राज्यातील अनेक संघ या चषकात सहभागी झाले आहे. त्यामुळे हा चषक अविस्मरणीय राहणार आहे असे व्यक्तव्य आ पवार यांनी केले. मंचावर राजकीय भाष्य टाळत त्यांनी प्रवीण घुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.