31 मे आधीच चोंडीचे राजकीय वातावरण तापले, अडीच वर्षात एखादे काम केले असेल तर दाखवा, पांडुरंग उबाळेंनी दिले आमदार रोहित पवारांना थेट अव्हान !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जन्मगाव चोंडीत खूप विकास केल्याचा विद्यमान लोकप्रतिनिधीचा दावा हास्यास्पद असुन, प्रत्यक्षात गेल्या अडीच वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधींनी चोंडीत एकही काम केलेले नाही. काम केले असेल तर दाखवा असे उघड आव्हान चोंडीचे माजी उपसरपंच पांडुरंग उबाळे यांनी आमदार रोहित पवार यांना देत राजकीय बार उडवून दिला आहे.

दरवर्षी 31 मे रोजी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा जयंती होण्याआधीच चोंडीचे राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडून चोंडीत विकास कामे केल्याचा दावा केला जात आहे, याच दाव्यावर भाजपकडून कडाडून टीका होऊ लागली आहे, चोंडीचे माजी उपसरपंच पांडुरंग उबाळे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत अडीच वर्षात चोंडीत एक तरी काम केले असेल दाखवा असे थेट अव्हान दिले आहे. 

मागच्या दोन वर्षात आमदारांनी चौंडीचा मोठ्या प्रमाणात परिपूर्ण विकास देखील केला आहे असे सांगतानाच ‘चौंडी कडे येणाऱ्या मुख्य रस्त्याची आजवरची परिस्थिती काय होती हे वेगळं सांगायला नको. या रस्त्याचं काम आजवर मंत्र्याला नाही जमलं ते एका नवख्या आमदाराने करून दाखवले आहे .’ अशा पध्दतीने टिपन्नी केल्याचे दिसून येत आहे. याबाबत लोकप्रतिनिधीच्या या दाव्याचा चोंडीचे माजी उपसरपंच पांडुरंग उबाळे यांनी जोरदार समाचार घेत प्रसिध्दीपत्रक काढून पोलखोल केली आहे.

पांडुरंग उबाळे यांनी म्हटले आहे की, कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करण्यात खूपच पटाईत आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधी कर्जत जामखेडमध्ये येवून तीन वर्ष झाली आहेत.यापुर्वी त्यांना या भागाची कसलीही माहिती नव्हती. असे असताना ते सोशल मिडीयातून स्वताला श्रेय घेत वारंवार दिशाभूल करणारी माहिती प्रसिध्द करत असतात. 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे जन्मगाव म्हणून विकास करण्याचा निर्णय झाला तो भाजपा शिवसेना युती सरकारच्या काळात सन १९९५ मध्ये. २७ वर्षापुर्वी दि २५ ऑगस्ट १९९५ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंढे  यांच्या उपस्थित चोंडीत झालेल्या २०० व्या पुण्यतिथीनिमित्त चोंडीच्या विकास कामांसाठी दोन कोटींची घोषणा करण्यात आली आणि ख-या अर्थाने चोंडीच्या विकासाचा पाया रचला गेला.

यासाठी तत्कालिन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी आपले मंत्रीपद पणाला लावत पाठपुरावा करत चोंडीत विविध विकास कामांना प्रारंभ केला. त्यावेळी चोंडीतील विकासकामे करून घेण्याची व यासाठी पाठपुरावा करण्याची तसेच देखरेख करण्याची जबाबदारी अण्णा डांगे यांनी आष्टी येथे प्राध्यापक म्हणून नोकरीला असलेले चोंडीचे सुपुत्र प्रा राम शिंदे यांच्यावर सोपवली. यासाठी अण्णा डांगे यांनी  प्रा राम शिंदे यांना नोकरीचा राजीनामा द्यायाला लावला. प्रा राम शिंदे यांनीही चोंडीतील विकासकामांना वाहून घेत, चोंडीचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

सन १९९५ मध्ये चोंडीतील विकास कामांची जबाबदारी प्रा राम शिंदे यांच्यावर देतानाच अण्णा डांगे यांनी प्रा राम शिंदे यांना चोंडी विकास प्रकल्पाचे सदस्य म्हणून राज्य सरकारच्या वतीने नियुक्ती करताना चोंडीतील विकास कामांची अधिकृत जबाबदारी दिली.  प्रा राम शिंदे पुढे चोंडीचे सरपंच , जामखेड पंचायत समितीचे सभापती , कर्जत जामखेडचे आमदार व पुढे राज्याचे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतरही त्यांनी चोंडीशी असलेली नाळ तोडली नाही. मंत्री पदाच्या काळात चोंडीतील विविध विकास कामांना भरघोस निधी देण्याचे काम प्रा राम शिंदे यांनी केले.

चोंडीत फुटपाथसह रूंद रस्ते, सीना नदीच्या कडेला संरक्षक भींत , हेलिपॅड , चोंडी – चापडगाव – राशीन रस्ता  , चोंडी – कवडगाव -अरणगाव रस्ता, चोंडी – हाळगाव रस्ता करतानाच चोंडी वेगवेगळया मार्गाने जोडण्यासाठी चोंडी – पिंपरखेड- फक्राबाद – कुसडगाव – जामखेड रस्ता , चोंडी- आगी- जवळा – उस्मानाबाद जिल्हा हद्द रस्ता , चोंडी – देवकरवस्ती रस्ता व  चोंडी – मलठण रस्ता करण्याचे काम त्यांनी केले.

चोंडीच्या विकास कामांबाबत प्रा राम शिंदे यांची असलेली  तळमळ मंत्री झाल्यानंतरही दिसून आली. हा इतिहास विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र सोईस्कर विसरतात.गेल्या २७ वर्षात चोंडीत जी कामे झाली आहेत.त्या प्रत्येक कामात प्रा राम शिंदे यांचा पाठपुरावा आणि सहभाग राहिलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे माहेरकडील आठवे वंशज म्हणून व जन्मभूमी म्हणून प्रा राम शिंदे यांचे चोंडीसाठी योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करण्यापुर्वी इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.उलट विद्यमान लोकप्रतिनिधींनी स्वता: आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपण चोंडीसाठी गेल्या अडीच वर्षात नेमक काय काम केले आहे असा टोला उबाळे यांनी लगावला आहे.

चोंडी येथील सीना नदीवरील बंधा-यात कुकडीचे पाणी सोडण्याचा निर्णय युती सरकारच्याच काळात १९९७ मध्ये झाला . प्रा राम शिंदे मंत्री असताना चोंडीला नियमित आवर्तन सुटत होते. मात्र मागील अडीच वर्षात एकदाही कुकडीचे पाणी चोंडी बंधा-यात सोडलेले नाही.  याप्रश्री शेतकरी आजही संताप व्यक्त करत आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात विद्यमान लोकप्रतिनिधींनी चोंडीत एक काम केलेले असेल तर दाखवा. असे उघड आव्हान पांडुरंग उबाळे यांनी दिले आहे.

गेल्यावर्षी चोंडीजवळ सीना नदीपात्र रूंदीकरण व खोलीकरणाचे काम भारतीय जैन संघटनेमार्फत व लोकसहभागातून झालेले आहे. मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात या लोकप्रतिनिधीचा कोणीही हात धरू शकणार नाही. जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्याचा उद्योग बंद करावा असे आवाहन उबाळे यांनी केले आहे.