भाजपच्या विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांसह अनेक बड्या नेत्यांची दांडी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात आठ ते दहा दिवसांपासुन सुरु असलेल्या राजकीय संघर्ष काल थांबला. महाराष्ट्र भाजप प्रणित नवे सरकार अस्तित्वात आले. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. मुळात हा निर्णय सर्वांना धक्का ठेणारा ठरला. देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री होतील या विश्वासाला मोठा तडा गेला. राजकारणात कधीही काहीही घडू शकते याचा प्रत्यय पुन्हा महाराष्ट्राला आला.

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले होते. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले जाईल असे चित्र होते. मात्र घडले उलटे. फडणवीसांची संधी शिंदेंच्या पारड्यात गेली. पत्रकार परिषदेत शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी घोषणा केली खरी, पण एक चाणाक्ष डाव खेळला, आपण सरकारसोबत असू पण सरकारमध्ये मंत्रीपदावर नसू, अशी घोषणा करून सगळ्यांनाच धक्का दिला. त्यांनी हा निर्णय पक्षावरील नाराजीतून घेतल्याचे स्पष्ट होते.

फडणवीसांच्या घोषणेनंतर केंद्रीय नेतृत्वाने तातडीने दखल घेतली. स्वता: मोदी आणि जे.पी नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर फडणवीस यांच्या त्यागाच्या आणि पक्षनिष्ठेच्या, समर्पणाच्या कथा भाजपाच्या बड्या नेत्यांकडून गायला जाऊ लागल्या पण फडणवीस हे नाराज असल्याचा संदेश सर्वदूर गेला होता, फडणवीस समर्थक आमदारांंचा एक गट नाराज असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर राज्यातील फडणवीस विरोधक कसा करेक्ट कार्यक्रम झाला ही भावना आपल्या चेहर्‍यावरून लपवू शकत नव्हते.

दरम्यान उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना देवेंद्र फडणवीस फारसे खूश नसल्याचे त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत होते. दरम्यान राज्यात भाजपची सत्ता आल्याने भाजपात जो जल्लोष असायला हवा होता तो काही राज्यात दिसून आला नाही.

दरम्यान भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज विजयोत्सव साजरा करण्यात आला. पण या कार्यक्रमाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड सह आदी नेत्यांनी पाठ फिरवली. यामुळे सर्वांनाच धक्का बसला.

  • मुंबई भाजपा कार्यालयात सत्तास्थापनेचा जल्लोष सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचा कट-आऊट हातात घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा नेता हा त्यागासाठी नेहमीच लक्षात राहिल असे ते म्हणाले.

तसेच, मुंबईला काही घराणी आपली जहागीर समजतात. पण मुंबई पालिकेच्या निवडणुकीत जनता राज येईल आणि घराणेशाहीचे राज्य संपुष्टात येईल, असा विश्वास व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

यासोबतच भाजपा मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी, ‘विधानसभा तो झांकी है, मुंबई महापालिका बाकी है’, अशा घोषणाही दिल्या. यावेळी ‘पद का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन पर चढते जाना’ असे फलक घेऊन कार्यकर्ते प्रदेश कार्यालयात दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षादेश मानत सर्वोच्च पदाचा त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले याचे साऱ्यांनीच कौतुक केले.