karjat nagar panchayat news | गोदड महाराजांच्या दरबारात राम शिंदेंचा मुक्काम

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : डाॅ अफरोज पठाण | karjat nagar panchayat news | कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीचे नाट्य  घडल्यानंतर माजीमंत्री राम शिंदे यांनी मौन व्रत धारण करीत गोदड महाराज मंदिराच्यासमोर सुरू केलेले ठिय्या आंदोलन सुरूच असून राम शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोदड महाराजांच्या दरबारात मुक्काम ठोकला आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रिया प्रशासनाने व्यवस्थित हाताळली. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गालबोट लागले. प्रभाग क्रमांक दोनच्या भाजपा उमेदवार नीता कचरे ह्या दुपारी पावणे दोनच्या सुमारास  उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आले असता भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी त्यास आक्षेप घेतला.

विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी आपल्या यंत्रणेचा वापर करीत दबाव, दहशत यासह आर्थिक आमिष दाखवत सदर उमेदवारांवर दडपण आणून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास भाग पाडले. यावेळी माजीमंत्री राम शिंदे कर्जत नगरपंचायत कार्यलयात आले असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अजित थोरबोले आणि सहायक अधिकारी गोविंद जाधव यांना धारेवर धरले.

लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पाडावी अशी मागणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधीच्या दडपशाहीच्या निषेधार्थ ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरासमोर दुपारी तीन वाजल्यापासून मौनव्रत घेत ठिय्या दिला.

karjat nagar panchayat news

शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत माजी मंत्री राम शिंदे यांचे ठिय्या अंदोलन गोदड महाराज मंदिरासमोर सुरू आहे. रात्रीचे बारा वाजून गेले तरी गोदड महाराज मंदिरासमोर राम शिंदे सह समर्थक कार्यकर्त्यांचे अंदोलन सुरू होते.

राम शिंदे यांचा आजचा मुक्काम गोदड महाराजांच्या दरबारातच होणार हे आता स्पष्ट आहे. कुठल्याही निवडणूक काळात अश्याप्रकारे अंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शिंदेंनी हाती घेतलेल्या अंदोलनाचे पडसाद काय उमटणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या अंदोलनाची चर्चा संपुर्ण कर्जत – जामखेड मतदारसंघात आणि राज्यात सुरू आहे.  ज्या मुद्द्यावर शिंदेंनी अंदोलन हाती घेतले आहे. तोच मुद्दा आता कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा मुद्दा बनणार हे जवळपास स्पष्ट आहे.

दरम्यान राम शिंदे व कर्जत भाजपने केलेल्या दडपशाहीच्या आरोपावर आमदार रोहित पवार नेमकी काय भूमिका घेणार ? या संपुर्ण प्रकरणावर काय बोलणार? याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.