क्लिन चिट धांदात खोटी, बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशी करा – आमदार राम शिंदेची मागणी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। इंदापुर तालुक्यातील बारामती ॲग्रोने नियमांचे उल्लंघन करत कारखाना सुरु केला. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार राम शिंदे यांनी केली होती. मात्र साखर आयुक्तांनी कारखान्याला क्लीन चीट दिली होती. परंतू आमदार राम शिंदे हे आपल्या आरोपांवर आजही ठाम आहेत. त्यांनी साखर आयुक्तांवर आरोप करत बारामती ॲग्रोची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

Clean chit fraud, high-level inquiry into Baramati Agro MLA Ram Shinde demands, ram Shinde latest news

एका वृत्तवाहिनीवर बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, “राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड हे दीड महिन्यानंतर निवृत्त होतायेत, त्यांच्यावर ज्यांची मेहरबानी झाली होती त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, पण त्यांनी शासन निर्णयाच्या विरोधात काम केलं आहे हे मात्र नक्कीयं असे सांगत शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे.”

यावेळी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, मी तर आरोप केलाय, मी त्या आरोपांवर ठाम आहे, 10 ऑक्टोबरला बारामती ॲग्रो साखर कारखाना सुरु झाला, त्यानंतर मी साखर आयुक्तांना व्हिडीओ दिले, तसेच साखर कारखान्यावरील आवश्यक ते सगळे पुरावे दिले. त्या कारखान्याची तत्काळ चौकशी करणे अपेक्षित होते. मात्र 20 तासानंतर साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी साखर कारखाना तपासणीसाठी कारखान्यावर गेले. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मेहरबानीने झालेला हा प्रकार आहे. त्यानंतर त्यांनी कारखान्याला क्लिन चिट दिली.

Jamkhed news, Jamkhed Times news

“राज्यातले सगळे कारखाने 15 ऑक्टोबरला चालू होणार आणि हा एकटाच साखर कारखाना 15 ऑक्टोबर पुर्वी कसा चालू राहतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना सुरु नव्हता तर स्व हितासाठी सुरु केला होता. या कारखान्याने सरकारने घेतलेल्या निर्णयाचं उल्लंघन केलं आहे.बारामती ॲग्रोला साखर आयुक्तांनी क्लिन चिट दिली असली तरी, तो कारखाना 10 ऑक्टोबरला सुरु होता. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. मी आजही त्या आरोपावर ठाम आहे असे राम शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.”

मी केलेल्या आरोपांची खात्री करायची असेल तर त्या कारखान्याला जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरचे सीसीटीव्ही तपासा, ज्या शेतकऱ्यांचा ऊस तोडला आहे त्यांच्या मुलाखती घ्या त्यांना विचारा कधीपासून ऊसतोड सुरु होती, त्या दिवशी कारखान्याने किती वीज वापरली याचं रिडींग तपासुन घ्या, त्या दिवशी किती ऊसाचं गाळप झालं याचं रिडींग घ्या. तसेच त्या दिवशीचं कारखान्याचे सॅटेलाईट पिक्चर घ्या, त्यात दिसेल कारखान्यावर किती टॅक्टर उभे आहेत ते दिसेल. मोळी पुजनाच्या कार्यक्रमाला कारखान्यात शेकडो ट्रॅक्टर नसतात. म्हणुन मी आजही माझ्या आरोपावर ठाम आहे असे सांगत राम शिंदे यांनी आता माघार नाही असाच पवित्रा घेतल्याचे दिसत आहे.

पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, बारामती ॲग्रोची क्लिन चिट मॅन्युप्लेट केलेली आहे. साखर आयुक्तांची मेहेरबानी आहे. त्यामुळे ती क्लिन चिट नाहीच आहे, धांदात खोटं आहे. चुकीचं आहे. त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. गेल्या वर्षी वेळे आधी कारखाने सुरु केल्याने राज्यातील 18 कारखान्यांना 70 कोटींचा दंड झालता. यंदा बारामती ॲग्रो हा कारखाना तारखेच्या आत सुरु झालाय त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी होऊन दंडात्मक कारवाई झालीच पाहिजे ही माझी मागणी आहे.

राम शिंदे शेतकरी विरोधी आहे हे बोलणं चुकीचं आहे. मग जर असं असेल तर, सगळे कारखाने का सुरु केले नाही. हा एकच का सुुुरू झाला. हा देखील प्रश्न निर्माण झालायं. ज्या कारखान्याने नियम तोडलाय त्या कारखान्याचे ते जर संचालक असतील तर त्यांचं नाव येणारचं, सगळ्या दुनियेला नियम आणि तुम्हालाच नियम नाही असं कसं होईल, असे म्हणत शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.