धमक असेल तर होऊन जाऊ दे, जनतेच्या मनातील आमदार कोण याचा फैसला,भाजपच्या सुनिल यादवांनी फोडली डरकाळी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी आमदार रोहित पवार यांचा राजीनामा घेऊन यावा, मीही आमदार राम शिंदे यांचा राजीनामा घेऊन येतो, मग होवून जाऊदे एकदाच, जनतेच्या मनातील आमदार कोण याचा फैसला, अशी डरकाळी फोडत भाजपा किसान आघाडीचे अहमदनगर उपाध्यक्ष सुनील यादव यांनी विरोधकांना जाहीर अव्हान दिले आहे.

BJP leader Sunil Yadav's strong attack on NCP

कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागला आहे. आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा सामना रंगलेला असतानाच आता दोन्ही नेत्यांचे समर्थक ऐकमेकांविरोधात दंड थोपटत आरोप प्रत्यारोपांची राळ उठवू लागले आहेत. यामुळे मतदारसंघाचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

कर्जत तालुक्यातील पाणंद रस्त्याची चौकशी लागल्यानेच राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडले आहे असा आरोप करत भाजपा किसान आघाडीचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष सुनील यादव यांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

यादव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आमदार राम शिंदे यांंना विधानपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली. जनतेने निवडून दिलेल्या आमदाराच्या मतावर ते पुन्हा आमदार झाले आहेत. राम शिंदे आमदार झाले म्हणून रोहित पवार यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. विरोधाला विरोध म्हणून काही कार्यकर्ते टीका करत आहेत.

राम शिंदे यांच्यावर जे लोक टीका करत आहेत त्यांना कधीही छोट्या मोठ्या संस्थेवर लोकप्रतिनिधी होता आले नाही. काहींचे तर स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये डिपाॅजीट जप्त झाले होते, डिपाॅजीट जप्त झालेल्यांनी वायफळ बडबड करून आपण फार मोठा नेता आहोत अशी फुशारकी मारू नये. असा टोला यादव यांनी लगावला आहे.

कर्जतची सुज्ञ जनता सर्व जाणते की कामदार व दमदार आमदार कोण आहे ते, निव्वळ भूलथापा व खोटे आश्वासन कोण देते हे सर्व जनता ओळखून आहे. काही जण सोशल मीडियावर पोस्ट टाकून आमदाराच्या मनात जाण्याचा व भ्रमनिरास करण्याचा आटापीटा करतात हे संपूर्ण मतदारसंघाच्या लक्षात आले आहे. असे सांगत यादव यांनी जोरदार समाचार घेतला.

पाणंद रस्त्याची चौकशी लागल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे संतुलन बिघडले आहे म्हणूनच राम शिंदेचा राजीनामा मागत आहेत अशी टीका यादव यांनी केली आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी आमदार रोहित पवार यांचा राजीनामा घेऊन यावा, मीही आमदार राम शिंदे यांचा राजीनामा घेऊन येतो, मग होवून जाऊदे एकदा, जनतेच्या मनातील आमदार कोण आहे ते असे अशी डरकाळी फोडत भाजपा किसान आघाडीचे अहमदनगर उपाध्यक्ष सुनील यादव यांनी विरोधकांना जाहीर अव्हान दिले आहे.