- Advertisement -

New Zealand vs India T20 match result । भारताने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा : T20 मालिकेवर भारताचा कब्जा !  

रांची : New Zealand vs India T20 match result । भारत विरूध्द न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळवण्यात आलेला दुसर्‍या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 7 विकेट आणि 14 चेंडू राखून धुव्वा उडवत सामना जिंकला आहे. या विजयासह भारताने T20 मालिकेवर कब्जा केला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिली T20 मालिका जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 153 धावा केल्या होता. भारताने हे आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर रोहित शर्मा (55) आणि के. एल. राहुल (65) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला आहे. (India won T20 series against New Zealand by defeating Kiwi team in 2nd t20)

आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी रोहितचा हा निर्णय सुरुवातीला चुकीचा ठरवला. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये तब्बल 64 धावा कुटल्या. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चांगलंच पुनरागमन केलं.

एकवेळ अशी होती की, न्यूझीलंड या डावात अगदी सहज 180-200 चा आकडा सहज पार करेल असे वाटत होते, मात्र मधल्या षटकात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. तसेच ठराविक अंतराने विकेट्सदेखील घेतल्या. परिणामी न्यूझीलंडचा डाव 6 बाद 153 धावांमध्ये रोखण्यात भारताला यश आलं. भारताकडून या डावात हर्षल पटेलने सर्वाधिक 2 बळी घेतले. तर अक्सर पटेल, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार आणि रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यानंतर 154 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सहज पार केलं. सलामीवीर के. एल. राहुलने पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. राहुलने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 49 चेंडूत 65 धावांची खेळी केली. तर रोहित शर्मा सुरुवातीला सावधपणे खेळत होता. मात्र मधल्या षटकांमध्ये त्याने गियर बदलला. रोहितने 36 चेंडूत 1 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांच्या सहाय्याने 55 धावा फटकावल्या.

रोहित-राहुल बाद झाल्यानंतर संघ अडचणीत येईल असे वाटत होते. मात्र 18 व्या षटकात भारताला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता असताना ऋषभ पंतने सुरुवातीच्या दोन चेंडूंवर सलग षटकार ठोकत सामना जिंकला आहे. दरम्यान, न्यूझीलंडकडून या सामन्यात एकट्या टिम साऊथीने चांगली गोलंदाजी केली. त्याने निर्धारित 4 षटकांमध्ये 16 धावांच्या बदल्यात 3 बळी घेतले. न्यूझीलंडच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही.

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता. आजचा सामना जिंकून भारताने 3 सामन्यांच्या मालिकेवर कब्जा केला आहे. त्यामुळे पुढच्या टी-20 सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे.