इतिहास रचला! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत भारत टी-२० विश्वविजेता; ९६ धावांनी ऐतिहासिक विजय, Sanju Samson, Jasprit Bumrah, Ishan Kishan, Abhishek Sharma
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण आज अवघ्या जगाने अनुभवला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि टी २० विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. संजू सॅमसनची वादळी फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने किवींचे आव्हान पूर्णपणे मोडीत काढले.भारताने सर्वाधिक विश्वचषक जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात टी २० वर्ल्ड कपचा फायनल सामना पार पडला. सामन्याची नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी घेत भारताला फलंदाजीस पाचारण केले होते. फलंदाजीस मैदानात उतरलेल्या सलामीवीर अभिषेक शर्मा व संजू सॅमसन या जोडीने सुरूवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला.
पहिल्या सहा षटकात ९२ धावा वसूल करत सामन्यावर भारताने मजबूत पकड निर्माण केली. सलामीवीर अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२ धावा कुटत भारताला वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावांची खेळी करत डावाला आकार दिला.
संजू सॅमसनची ऐतिहासिक वादळी खेळी
मात्र, आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो संजू सॅमसनने. त्याने अवघ्या ४६ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची खेळी केली. संजूचे शतक जरी थोडक्यात हुकले असले, तरी त्याच्या या खेळीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. शेवटच्या षटकात शिवम दुबेने केवळ ८ चेंडूत २६ धावा कुटत भारताला २५० धावांच्या पार पोहोचवले.
जसप्रीत बुमराह ४ विकेट
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहने ४ विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला फिरकीपटू अक्षर पटेलने उत्तम साथ दिली. अक्षरने ३ ओव्हरमध्ये २७ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी मिळवले.
- थोडक्यात सामन्याचे हायलाईट्स:
- भारत: २५५ /५ (२० षटके).
- न्यूझीलंड: १५९/१० (१९षटके).
- विजयी अंतर: ९६ धावा.
’कॅचेस विन मॅचेस’: इशान किशनची अप्रतिम फिल्डींग
विजयात जेवढा वाटा फलंदाज आणि गोलंदाजांचा होता, तेवढाच वाटा क्षेत्ररक्षकांचाही राहिला. ‘कॅचेस विन मॅचेस’ या उक्तीप्रमाणे इशान किशनने मैदानात ३ अफलातून झेल टिपून सामन्याचे चित्र भारताच्या बाजूने झुकवले. इशान जिकडे तिकडे चेंडू असेच काहीसे चित्र सामन्यात अनेकदा दिसले. तिलक वर्मानेही दोन महत्वाचे झेल घेत आपले योगदान दिले.
- पुरस्कारांची लयलूट
- मॅन ऑफ द मॅच: जसप्रीत बुमराह (४ विकेट्स).
- मॅन ऑफ द सिरीज: संजू सॅमसन (संपूर्ण स्पर्धेत ३२१ धावा).
भारताच्या या ऐतिहासिक विजयामुळे जामखेडसह संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.