पुरोगामी विचारांचा धगधगता अंगार थंडावला : प्रा दिनेश रोडे सरांनी घेतला जगाचा निरोप

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पुरोगामी विचारांचे खंदे पुरस्कर्ते असलेले जेष्ठ पत्रकार प्रा दिनेश रोडे सरांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. मृत्युसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

जामखेड तालुक्यातील जवळा या गावचे रहिवासी असलेले प्रा दिनेश रोडे हे कला शिक्षक म्हणून रयत शिक्षण संस्थेत ३९ वर्षे कार्यरत होते. उपप्राचार्य आणि प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. श्री.धर्मनाथ विद्यालय, जवळा (ता.पारनेर) येथे ते सेवानिवृत्त झाले. कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी ते नेहमी आग्रही असतं. विकासाच्या नवनवीन संकल्प ते नेहमी मांडत. यासाठी ते सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांतून आवाज उठवत विशेषता: सोशल मिडीयावर ते अभ्यासू भूमिका मांडत होते.

मागील ४० वर्षे त्यांनी कर्जतमध्ये पत्रकारिता केली. या काळात त्यांनी केलेले सडेतोड लेखन सातत्याने गाजले, भ्रष्टाचारी अन दुर्जनांची झोप उडवणारी बातमीदारी त्यांनी निष्ठेने केली. पुरोगामी विचारांचा धगधगता अंगार म्हणून दिनेश रोडे सरांची विशेष ओळख होती.

समाजातील अनिष्ट रूढी परंपरांविरोधात ते नेहमी सडेतोड भूमिका मांडत असायचे. शिक्षण, पत्रकारीता, साहित्य आणि कला या क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा भरीव ठसा उमटवला. विद्यार्थ्यांसह राजकारणात येऊ पाहणाऱ्या नवोदित कार्यकर्त्यांसाठी रोडे सरांची भेट व मार्गदर्शन म्हणजे चालत्या बोलत्या विद्यापीठाने दिलेला गुरुमंत्रच ठरायचा. वेगवेगळे संदर्भ, कंगोरे अन परिणाम यावर ते सहजतेने वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करून जायचे.

प्रा दिनेश रोडे सरांनी ४० वर्षाच्या पत्रकारितेत अनेक दैनिकांमध्ये पत्रकार स्तंभलेखक म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर रेखाटलेली अनेक भेदक व्यंगचित्रे गाजली. साहित्य क्षेत्रातही रोडे सरांनी मोठे योगदान दिले ‘आगाटी’,व ‘कुणब्याची जिनगानी’ हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत. तर रेषेतून रंगातून कोणतेही चित्र साकारण्याची एक वेगळी शैली रोडे सरांनी विकसीत केली होती.प्रा दिनेश रोडे सर हे एक व्यासंगी, दिलदार, अजातशत्रू, अभ्यास व कलंदर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीचे खुप मोठे नुकसान झाले आहे.

जामखेड टाईम्स व जामखेड तालुका डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने दिवंगत प्रा दिनेश रोडे सरांना भावपूर्ण श्रध्दांजली !