शिर्डी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास 30 हजारांहून अधिक लाभार्थी राहणार उपस्थित, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे उद्या १७ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तगडी तयारी केली आहे. हा कार्यक्रम शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील मैदानावर होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत.
महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवत आप-आपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष तर तालुक्यातील तहसीलदार, गटविकास दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, कार्यक्रमाच्या दिवशी लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या बसेसचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येवून प्रत्येक बसमध्ये ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी. जेणे करून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणणे व परत घेवून जाणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे कार्यक्रम स्थळी व पार्कींगच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांच्या जेवणाच्या व्यवस्था, कार्यक्रमस्थळी पिण्याचे पाणी याबाबत देखील नियोजन देखील करण्यात यावे.
लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व यंत्रणेमध्ये समन्वय राखण्यात यावा. लाभार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत कुठेही असुविधा निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमापूर्वी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांत शासकीय योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात येईल. याचे नियोजन करण्यात यावे. अशा सूचनाही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत.
पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, कार्यक्रमस्थळी व लाभार्थ्यांच्या प्रत्येक बसेस मध्ये आरोग्य पथके कार्यरत ठेवण्यात यावी. कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या स्टॉल्सवर शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.
या बैठकीनंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी कार्यक्रमासाठी तयार करण्यात येणारी मंडप व्यवस्था, विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लाभार्थ्यांच्या आसन व्यवस्था याबाबत चर्चा केली.