Maratha Reservation Movement: कर्जतमधील युवकाच्या “या” निर्णयामुळे मराठा अंदोलकांचा मुद्दा राज्यात पुन्हा आला चर्चेत

Maratha Reservation Movement

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation Movement) राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अंदोलनामध्ये राज्यातील अनेक मराठा युवकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे जोपर्यंत सरकार मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार एका युवकाने केल्याने मराठा आरक्षणासाठी लढलेल्या अंदोलकांचा ज्वलंत मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे.

09 ऑगस्ट हा दिवस देशात क्रांतीदिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून कर्जतमधील नितीन तोरडमल या युवकाने मराठा आरक्षणाच्या अंदोलनादरम्यान (Maratha Reservation Movement) अनेक अंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत यासाठी पायात चप्पल न घालण्याचा निर्धार केला आहे. सरकार जो पर्यंत गुन्हे मागे घेणार नाही तो पर्यंत हा युवक समाजाच्या न्याय हक्कासाठी पायात चप्पल न घालत हे अंदोलन सुरू ठेवणार आहे.

याबाबत नितीन तोरडमल या युवकाने जामखेड टाईम्सशी बोलताना सांगितले की, मागील चार पाच वर्षामध्ये राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची अंदोलने राज्यात केली आहेत. (Maratha Reservation Movement) या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या अनेक शाळकरी मुले, काॅलेज तरूण तरूणी, युवक आणि कार्यकर्त्यावर सरकारने मोठया प्रमाणात गुन्हे दाखल केले आहेत.

ते सर्व गुन्हे आज कोर्टात न्यायप्रविष्ट असून अनेकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने त्यांना शिक्षण, नोकरी व व्यवसाय यामध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासह वरील कारणामुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.

सरकारने अनेकवेळा मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी खूप वेळा घोषणा करुन आश्वासने दिली आहेत. परंतु त्यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गुन्हे तसेच प्रलंबित आहेत. पाठपुरावा करून देखील त्यावर काही तोडगा निघत नाहीये.

त्यामुळे मराठा समाजाच्या अनेक अंदोलनामध्ये सर्वांबरोबर सक्रीय सहभाग असणारे बहिरोबावाडी (ता.कर्जत) येथील मराठासेवक नितीन तोरडमल या युवकाने ९ ऑगस्ट या क्रांती दिनापासून सरकारने न्यायालयातील सर्व गुन्हे प्रत्यक्षपणे मागे घेत नाही, तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मराठा समन्वयक अँड. धनराज राणे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत माहिती दिली आहे.

(कर्जत – अफरोज पठाण)