कर्जतच्या तहसीलदारांचे खेड ग्रामपंचायत आणि तलाठ्याला खरमरीत पत्र

अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर महसुल पथकाच्या ताब्यात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :डॉ अफरोज खान पठाण | कर्जत महसुल पथकाने खेड शिवारात अवैध वाळू वाहतूक करताना एक टीपर ताब्यात घेतला असून पुढील कारवाईसाठी तो प्रांत कार्यलयाच्या आवारात जमा केला असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली. यासह तहसीलदार आगळे यांनी खेड ग्रामपंचायत आणि संबंधित सजेच्या तलाठ्यास अवैध गौण खनिज उत्खनन व त्याच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याच्या सक्त सुचना देणारे खरमरीत पत्र लिहल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेड(ता.कर्जत) दि २७ च्या मध्यरात्री १ वाजता कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना भीमानदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरु असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. तहसीलदार आगळे यांनी तात्काळ महसुल पथक तयार करीत खेड गाठले असता त्यांना विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करताना एक टीपर आढळून आला. यावेळी चालकांकडे वाळू वाहतूक करण्याचे परवानाबाबत विचारणा केली असता आपल्याकडे नसल्याचे पथकास सांगितले.

तसेच गाडी मालकाच्या बाबत अधिक विचारणा केली असता संबंधित चालकांने काका काळे (रा.करपडी ता. कर्जत) याच्या मालकीचा टीपर असल्याचे सांगितले. वाहनाचा क्रमांक खोडला असल्याने पुढील कारवाईसाठी तो टीपर कर्जत प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आला असून त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पत्रकारांना दिली. सदरची कारवाई प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नानासाहेब आगळे, तलाठी सुनील हसबे, गणेश सोनवणे, अभिजित शेलार, विकास मोराळे यांनी पार पाडली.

खेड ग्रामपंचायत आणि तलाठी यांना तहसीलदारांचे खरमरीत पत्र

खेड परिसर आणि भीमानदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची बातमी व माहिती विविध प्रसिद्ध माध्यमातून निदर्शनास येत आहे. शासन निर्णयानुसार खेड ग्रामस्तरीय दक्षता समिती, पदाधिकारी, पोलीस पाटील आणि संबंधित सजेचा तलाठी यांची अवैध उत्खनन व त्याच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र ती जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडत नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचा अहवाल जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे का सादर करण्यात येऊ नये ? या आशयाचे खरमरीत  पत्र पाठवत दोन दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश तहसीलदार आगळे यांनी दिले आहे.