राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते : खासदार सुजय विखे पाटील

कर्जत - जामखेडमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा अर्थ वेगळा

  • ठळक मुद्दे

  • विखेंनी वाचला विकास कामांचा पाढा
  • राजकारणात स्वाभिमान महत्वाचा
  • कर्जत – जामखेडची ओळख राम शिंदेंमुळेच
  • अन आमचा नंबर हुकला..
  • राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते
  • कर्जत – जामखेडमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा अर्थ वेगळा
  • डाॅ भगवान मुरूमकरांची फिरकी
  • विरोधकांचा फोटो, बोर्ड आणि कार्यक्रम
  • जन्माला आणायसाठी मार्गदर्शन घ्याव लागतं

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तारशेख । खासदार सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) जामखेड तालुका दौऱ्यावर होते. या दौऱ्यात विखे यांनी जोरदार बॅटिंग केली. आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) जोरदार हल्ला चढवला. पक्षांतर केलेल्यांना इशारा दिला. तर राम शिंदे (Ram Shinde) यांच्या कामाचेही गुणगान गायले. तसेच एक खंतही बोलून दाखवली. सुजय विखे यांचा दौरा भलताच चर्चेचा ठरला. त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे मंगळवारचा दिवस भलताच गाजला.

यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, काम केलं राम शिंदेंनी, नारळ फोडतयं कोण, मंजुरी आणली मी, कार्यक्रमाला लोकं आले दुसरेच पण मला याचा आनंद होतो, कारण की ज्या माणसाला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने केला तो माणूस भाजप आणि राम शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली निवडून आल्यानंतर दोन वर्षात काय काय काम करू शकला हे अहमदनगरमधील कार्यक्रमाच्या माध्यमांतून त्यांना दाखवलं.ते विचार करत असतील ह्याला उगचं विरोध केला. हा तर टॅलेंटेट माणूस दिसतोय असे  म्हणत विखे यांनी अहमदनगरमध्ये नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांची झालेली उपस्थिती यावरून निशाणा साधला.

राजकारणात स्वाभिमान महत्वाचा

ना आपण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जातो ना दुसर्‍याचा कधी कार्यक्रम घेतो. राजकारणात स्वाभिमान फार गरजेचा असतो. माज वेगळा पण स्वाभिमान असायलाच हवा. मला अनेक लोकं बोलले नारळ फोडा पण राम शिंदे यांनी मंजुर केलेल्या कामांचे मी कधीच नारळ फोडले नाही.  कारण माझा स्वाभिमान मला ही गोष्ट करण्याची परवानगी देत नाही. जे काम माझं नाहीच त्याचं मी कधीच क्रेडिट घेऊ शकतं नाही. ही शिकवण कै. बाळासाहेब विखे पाटलांनी आम्हाला दिलेली आहे. त्याच आधारावर विखे कुटूंब जिल्ह्यात विकासाचे राजकारण करत आहे.

कर्जत – जामखेडची ओळख राम शिंदेंमुळेच

काय होतं जामखेडमध्ये ? काय होतं कर्जतमध्ये? या तालुक्यांची ओळख अहमदनगर जिल्ह्याला नव्हती. या भागातला कार्यकर्ता, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य कधी जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर त्याला कुणी विचारत नव्हतं. कर्जत जामखेडला अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाच्या नकाशावर जर कोणी आणलं असेल तर त्याचं सर्व श्रेय राम शिंदे यांचं आहे. दुसरं कुणाचं नाही. राम शिंदे यांचे कौतुक करत विखे यांनी जोरदार बॅटिंग केली.

अन आमचा नंबर हुकला..

काळ बदलायला वेळ लागत नाही. सत्ता येते जाते. तुम्ही जरी पाच वर्षे पालकमंत्रीपद भोगलं, आम्ही तर पाच वर्षे विरोधात होतो. इकडं यायचा आमचा नंबर लागायची वेळ आली अन आमचा नंबर हुकला. जिल्हा परिषदही गेली अशी खंत सुजय विखे यांनी बोलून दाखवली.

कर्जत – जामखेडमध्ये कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा अर्थ वेगळा

कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांच्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा अर्थ फार वेगळा लावलाय, तुमच्यामुळे ही सवय लागलीय असे राम शिंदे यांना उद्देशून म्हणत विखे पुढे म्हणाले ताकद द्यायची म्हणजे कार्यकर्त्याला काम द्यायचे, वाळू मुरूमाची गाडी पकडली तर ती फोन लावला की सोडली पाहिजे ही सवय लागली आहे. कार्यकर्त्यांना ताकद द्यायची म्हणजे जनकल्याणाच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचणे हे होय. लोकांपर्यंत योजना पोहचल्या की कार्यकर्त्यांना आपोआप ताकद मिळते असे विखे म्हणाले.

विखेंनी वाचला विकास कामांचा पाढा

सुजय विखे म्हणाले, गेल्या दोन वर्षात कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत  अहमदनगर करमाळा हायवेला 2000 हजार कोटींचा निधी मिळवला. अहमदनगर – जामखेड रस्त्यासाठी 37 कोटी निधी आणत रस्त्याचे डांबरीकरण केले. हा रस्ता इतका मजबूत केला कि,अतिवृष्टी होऊनही रस्त्याला एकही खड्डा पडला नाही. कारण त्या रस्त्यात एकही रूपया मी खाल्ला नाही. ठेकेदाराकडून दर्जेदार काम करून घेतले.

तसेच जामखेड शहराकडून बीडकडे जाणाऱ्या रस्त्याला नॅशनल हायवे 548 ड चा दर्जा मिळवला. या रस्त्याच्या  जामखेड ते बीड रोड पर्यंतच्या चार पदरी कामासाठी 135 कोटी रूपयांचा निधी मंजुर करून आणला. तसेच आढळगाव ते जामखेड या नॅशनल हायवेसाठी 400 कोटी मंजुर झालेत. काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत पुढच्या दोन महिन्यात जामखेड तालुक्यात 25 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमांतून मोफत लसीकरण सुरू आहे. जामखेड तालुक्यातील एक लाख लोकांनी लस घेतली आहे. कोरोना काळात मोफत धान्य दिले.

राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटते

राम शिंदे यांनी सुरू केलेल्या विकासाचा प्रवाह त्यांच्या पराभवानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पुन्हा मतदारसंघात हाती घेतला आहे.राम शिंदेंचा निकाल पाहून मला भीती वाटायला लागली आहे. कामं जास्त झाली की आपण मागं येतो.

विरोधकांचा फोटो, बोर्ड आणि कार्यक्रम

ग्रामपंचायतीला 15 व्या वित्त आयोगाचा निधी केंद्राचा. प्रत्येकाला मिळणारी लस केंद्र सरकारची, कोविड काळात मिळणार धान्य केंद्र सरकारचं, नॅशनल हायवेचे सर्व रस्ते केंद्र सरकारचे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना केंद्राची,60 वर्षाच्या व्यक्तीला लाभ देणारी योजना केंद्र सरकारची, मग (विरोधकांचं) ह्यांचं आहे काय ? ह्यांचं फक्त फोटो, बोर्ड, आणि कार्यक्रम.

जन्माला आणायसाठी मार्गदर्शन घ्याव लागतं

टेस्ट ट्युब बेबी उपचारासंदर्भातील फलकावरून टिका करताना विखे म्हणाले की, मला जामखेडमध्ये आल्यावर कळालं की, जन्माला आणायसाठी मार्गदर्शन घ्याव लागतं, भविष्य कालावधीत कर्जत जामखेडमध्ये अजुन काय काय पहावं लागणार आहे असे म्हणत देशाची आधीच लोकसंख्या वाढलीय त्यात ही मोफत सल्ले द्यायची वेळ आली म्हणत अप्रत्यक्षपणे रोहित पवार यांना टोला लगावला.

डाॅ भगवान मुरूमकरांची फिरकी

डाॅ भगवान मुरूमर यांच्याकडे पाहत विखे म्हणाले, डाॅक्टर आता कामाला लागा, संघर्ष आहे. लढा. लढवाचं लागतयं. त्यांना करू द्या काय मार्गदर्शन करायचयं ते. त्या सल्ल्याची गरज असेल तर तिकडे जा, आमचं काहीही म्हणणं नाही. तुमचं वय झालंय आता तुम्ही सल्ल्याच्या पलिकडे गेला आहात अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये जोरदार खसखस पिकली होती.

आमचंही कुणी ऐकत नाही

आज आमच्यावरही वाईट काळ आहे. आमचंही कोणी ऐकत नाही. आम्हीही लढतोय. आपण सर्व जण लढत आहोत.त्यामुळे संघर्षाला घाबरायचं नाही. आपल्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्यासारखी व्यक्ती उभी आहे.

पहा : खासदार सुजय विखे पाटलांची जोरदार फटकेबाजी