पत्रकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असलेली वाॅट्सअप पोस्ट चर्चेत, महावितरणचा अधिकारी कुटुंबासह बेपत्ता

सोलापूर :  पंढरपूर तालुक्यातून एक अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. पंढरपूर  तालुक्‍यातील भोसे येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश वगरे (वय ३२) हे पत्नी आणि दोन लहान मुलींसह गुरुवारी (ता.३) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत.

बेपत्ता होण्यापूर्वी वगरे यांनी त्यांच्या ऑफीसमधील सहकाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर एक पोस्ट टाकली आहे. पटवर्धन कुरोली येथील प्रहार संघटनेचे दोन जण आणि दोन पत्रकारांच्या त्रासाला कंटाळून आपण पत्नी आणि दोन लहान मुलींसह आत्महत्या करत असल्याचे त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. बेपत्ता होऊन चोवीस तास उलटूनही त्यांचा शोध लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पंढरपुर तालुक्‍यातील पांढरेवाडी येथील रहिवासी असलेले गणेश वगरे हे २०१० पासून महावितरणमध्ये सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२१ पासून पंढरपूर उपविभाग ग्रामीण दोनमध्ये ते कार्यरत आहेत. ऑक्‍टोबरपासून त्यांच्याकडे महावितरण शाखा कार्यालय, भोसे येथील अतिरिक्त पदभार आहे.

वगरे हे ता. ३ रोजी सोनके येथे सासुरवाडीला आले. सायंकाळी ते पत्नी आणि दोन मुलींसह कारमधून पांढरेवाडीला घरी जातो म्हणून बाहेर पडले. परंतु, ते सर्वजण पांढरेवाडी येथे न जाता बेपत्ता झाले आहे. या प्रकरणी वगरे यांच्या मेव्हण्याने पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली.

बेपत्ता होण्यापूर्वी वगरे यांनी त्यांच्या ऑफीसमधील सहकाऱ्यांच्या व्हॉटसॲप ग्रुपवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, पटवर्धन कुरोली येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदाधिकारी आणि त्याचा भाऊ यांनी बील भरले नाही म्हणून त्यांचे कनेक्‍शन कट केल्याने घोडके वायरमन आणि आपल्याविरुध्द बिनबुडाचे, तथ्यहिन आरोप करत आहेत.

वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्या तक्रारींची समितीमार्फत चौकशी करुन तक्रारीत तथ्य नसल्याचे लेखी कळवले आहे. तरीही ते जाणून बुजून आंदोलनाची पत्रे देऊन त्याच्या स्थानिक वर्तमानपत्रात खोट्या बातम्या देऊन आपली बदनामी करत आहेत. दोन पत्रकार त्यांच्या खोट्या बातम्या देऊन तडजोड करावी म्हणून आपल्याकडे येत होते.

आपण चांगली नीतीमूल्ये जपणारा माणूस आहे. महावितरणमध्ये काम करत असताना भोसे सबस्टेशनला आपण जिल्ह्यात एक नंबरला आणून ठेवले. या बाबत आपल्याला शाबासकी मिळाली आहे. अशा परिस्थितीत बदनामीमुळे आपले कुटुंब नैराश्‍यात गेले आहे.

या नैराश्‍यातून आपण तसेच पत्नी स्वाती हिने आमच्या दोन लहान मुलीसह जीवनयात्रा संपवण्याचा दृढनिश्‍चय केला आहे. आपल्याला पटवर्धन कुरोली येथील दोघे आणि अन्य दोन पत्रकारांनी आत्महत्येस प्रवृत्त केले आहे, असे वगरे यांनी व्हॉटसॲप पोस्टमध्ये नमूद केले आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक धनंजय जाधव म्हणाले, गणेश वगरे व कुटुंबिय सोनके येथून सासूरवाडीतून घरी परत जात असताना बेपत्ता झाले आहे. त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन सांगोला दाखवित आहे. पोलिसांची दोन पथके तयार करुन ठिकठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.