शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : खरीप हंगामासाठी वेळेत खते खरेदी करण्याचे कृषी विभागाचे‌ शेतकऱ्यांना आवाहन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दजन्य परिस्थिती, विविध देशांवर लावण्यात आलेले निर्बंध, कच्च्या तेलाचे वाढलेले भाव, खतांच्या आयाती बाबतीत जागतिक वाहतूकीसाठी येणाऱ्या अडचणी यामुळे खरीप हंगाम २०२२ मध्ये संभाव्य दरवाढ व खताची टंचाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतक-यांनी संभाव्य दरवाढ व खताची टंचाई टाळण्यासाठी आवश्यक असणारी खते वेळेत खरेदी करून ठेवावीत असे आवाहन अहमदनगर जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने भात, बाजरी, तूर, मूग, उडिद, सोयाबिन, कापूस, मका इत्यादी पीके घेतली जातात. यासाठी जून महिन्यामध्ये खताची आवश्यकता असते. आवश्यक खताच्या खरेदीसाठी शेतकरी मे महिन्यामध्येच पूर्वनियोजन करत असतात. ही बाब लक्षात घेऊन या पूर्व नियोजनासाठी रब्बी हंगाममधला शिल्लक खत साठयाची आवश्यकता भासते. या शिल्लक खतसाठ्यामुळे खरीप हंगामामध्ये खत तुटवडा होत नाही.

अहमदनगर जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ५१६.५० मि.मी. इतके असून मागील वर्षी ६७०.४० मि.मी. इतके पर्जन्यमान झाले होते. खरीप हंगामाकरीता असणारे सरासरी क्षेत्र ५ लाख पन्नास हजार ४९ हेक्टर इतके असून मागील वर्षी ८ लाख ९ हजार १३  हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याचप्रमाणे १ लाख ८५ हजार २५  मे. टन खताचा शेतकऱ्यांनी वापर केला होता.

सद्यस्थितीत विचार केला असता, येणाऱ्या खरीप हंगामासाठी ८ लाख ३८ हजार ९४६ हेक्टर क्षेत्र पेरणीचे लक्षांक ठेवले असून त्याप्रमाणे २ लाख ७५ हजार ५०५ मे.टन खताची मागणी येण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने युरीया १ लाख १० हजार ८२३  मे.टन., एमओपी १६ हजार ८७८  मे.टन, डीएपी २८ हजार ३६८ मे.टन, संयुक्त खते ८४ हजार ३५ मे.टन, एसएसपी ३५ हजार ४०० मे. खतांचा समावेश आहे. रब्बी हंगामामधील शिल्लक खत साठा साधारणतः ६२ हजार ५९९  मे. टन इतका आहे.

खतांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ०२४१/२३५३६९३ या दूरूध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.असे आवाहन ही या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.