अहमदनगर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून अधिनियम 1897 कलम 2(1) नुसार कोरोना प्रतिबंध आदेश जारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा, 31 डिसेंबर 2021 । कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी आणि उपाययोजना करणे कामी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग अधिनियम 1897 च्या नियमावलीनुसार त्यांना प्राप्त अधिकारानुसार जिल्हयात 31 डिसेंबर रोजीचे रात्री 12 वाजेपासून पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक निर्बंध आदेश जारी केले आहेत.

त्यानुसार विवाह समारंभ, बंद किंवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 50 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे.

तसेच, कोणत्याही मेळावे, कार्यक्रमाच्या बाबतीत मग ते सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम बंद जागेत अथवा मोकळया जागेत आयोजित करताना उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त 50 पर्यंत मर्यादित ठेवण्याचे आणि अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे आदेशित केले आहे.

उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 च्या तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता च्या कलम 188 नुसार दंडनिय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असेही त्यांनी आदेशित केले आहे. (Corona restraining order issued under section 2 (1) of the Act 1897 in Ahmednagar district from midnight today)