जातपडताळणी समितीचे कामकाज ऑनलाईन झाल्यामुळे कामकाजात आली तत्परता – समिती सदस्या अमीना शेख

अहमदनगर, दि.०२ :  जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र वाटपासाठी जिल्हा समितीचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. त्यामुळे समित्यांच्या कामकाजात तत्परता आली आहे. असे मत अहमदनगर जिल्हा जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्या तथा उपायुक्त अमीना‌ शेख यांनी आज येथे व्यक्त केले.

 As the work of Caste Verification Committee went online, the work has become more prompt - Committee Member Amina Shaikh

शासनाच्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने पारनेर येथील न्यू आटर्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी प्राचार्य व कर्मचाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना श्रीमती शेख बोलत होत्या. या शिबिरात पारनेर तालुक्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

श्रीमती शेख म्हणाल्या, पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) समन्वयाने राज्यातील जातपडताळणी समित्यांचे कामकाज ऑनलाईन झाले आहे. https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. निवडणूक, सेवा व शैक्षणिक कारणास्तव जातपडताळणी समित्यांकडे अर्ज करता येतो. समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या या समित्यांकडे एससी, ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या जातप्रवर्गासाठी अर्ज करता येतो.

सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष लाभार्थी विद्यार्थ्यांस प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या काळात प्रमाणपत्र वाटपाचे मेळावे घेतले जातील. तालुका स्तरावर कॅम्प घेतले जातील. यातून जात पडताळणीच्या कामात गतिमानता व पारदर्शकता येणार आहे. असे ही श्रीमती शेख यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर  जिल्हा जातपडताळणी समितीवर तीन सदस्यांचा समावेश आहे‌.सध्या अहमदनगर समितीत अध्यक्ष म्हणून अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे, सदस्य तथा उपायुक्त अमीना शेख व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे हे कामकाज पाहतात. असे श्रीमती शेख यांनी यावेळी सांगितले.

जातपडताळणी विभागाचा प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाऊन जात प्रमाणपत्रांविषयी शंकांचे समाधान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा भावना विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या कार्यशाळेत तालुक्यातील १० विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.