Karjat news | कर्जत वनविभागाच्या जाळ्यात अडकला शिकारी ; मिळाली 14 दिवसांची वनकोठडी
रेहकुरी वनविभागाची धडाकेबाज कारवाई
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्याच्या वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रयत्न वनविभागाने हाणून पाडला आहे. याप्रकरणात एका शिकार्याला ताब्यात घेण्याची कारवाई वनविभागाने केली आहे. ही कारवाई रेहकुरी वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांच्या पथकाने केली.
याबाबत कर्जत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि ६ सप्टेंबर रोजी रेहकुरी अभयारण्य शिवारात बीट क्रमांक १६१/ड मध्ये शिकाऱ्यांनी वन्यप्राण्याची शिकार करण्याच्या हेतूने वाघर (जाळे) लावले होते.
चर्चेतल्या बातम्या
गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली होती. घटनास्थळी वाघर (जाळे) आढळून आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिकणार्यांचा शोध घेतला असता त्यांना तिथे कुणीच आढळून आले नाही. मात्र घटनास्थळी एक दुचाकी, दोन नायलॉनचे मोठे जाळे, कोयते आणि इतर मुद्देमाल मिळून आला होता.
कर्जत वनविभागाने दुचाकी कुणाच्या मालकीची आहे याचा शोध घेतला असता आरोपी ज्ञानेश्वर सुरेश काळे (रा. कुळधरण ता.कर्जत) याची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मेळघाट सायबर सेल वनविभाग यांच्या मदतीने आरोपीचे स्थान मिळाले. परंतु आरोपीने तेथून देखील गुंगारा दिल्याने अखेर पोलिसांच्या मदतीने आरोपी काळे याला पकडण्यात यश आले.
काळे याने आपल्या इतर साथीदारांची माहिती दिली असुन इतर साथीदार आरोपी हे रेहकुरी व कुळधरण परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.अटक आरोपी काळे यास १४ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी मिळाली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार यांनी दिली.
या कारवाईसाठी पुणे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या आदेशाने पुणे वन्यजीव विभागीय वन अधिकारी डी वाय भुरके, सहायक वनसंरक्षक डी आर वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर केदार अधिक तपास करीत आहे.
कर्जत प्रतिनिधी – डाॅ अफरोज पठाण
हेही पहा ⤵️