आजारी बाळाला घेऊन आईचा पुराचा पाण्यातून जीवघेणा प्रवास

बुलढाणा : विदर्भातील अनेक भागात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे.अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.या पूर परिस्थितीचा एक बोलका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पूर्णा नदीच्या पाण्यामुळं मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं गेल्या तीन दिवसापासून काळेगावचा संपर्क तुटला आहे. या गावातील एका लहान बाळाला खूप ताप आला होता. यावेळी बाळाला त्याच्या आईसह मलकापूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी टायरवर बसवून 12 फूट पाण्यातून जीवघेणा प्रवास करत नदी पार करावी लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर घुसल्यानं पूर्णा काठच्या गावाना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे.

पूर्णा नदीच्या पाण्यामुळं काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातून एका आजारी पडलेल्या लहान बाळाला घेऊन आईनं 12 फूट पाण्यातून प्रवास केला आहे.

या गावात पोहोचण्यासाठी आम्ही युद्ध स्तरावर प्रयत्न करत आहोत. याठिकाणी आताच एक बोट लावण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी दिली आहे. अनेक रुग्ण या गावात अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पूर्णा नदीला पूर आला आहे. या पुरामुळं अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळालं आहे. अनेकांनी कर्ज काढून पेरणी केली होती. पीक चांगलं उगवलं होती. मात्र पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे सगळंच हिरावून घेतलं आहे.

बुलढाण्यातील देऊळगाव पातुर्डा परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पुराचं सर्व पाणी नदीकाठच्या परिसरात असलेल्या शेतीतशिरलं असल्यानं, यामुळं परिसरातील हजारो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर अशी पीक पाण्याखाली गेली आहेत. पूर्णा नदीकाठी असलेल्या सर्व शेतात हीच परिस्थिती आहे असे abp माझाच्या वृत्तात म्हटले आहे.