Shivraj Rakshe News : डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे शासकीय सेवेत दाखल, या विभागात सरकारने केली नियुक्ती
Shivraj Rakshe News : पुणे जिल्ह्यातील शिवराज राक्षे या प्रतिभावंत पैलवानाने कुस्ती क्षेत्रात घेतलेल्या कष्टाला दोनदा मोठे यश मिळाले. शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरी किताबाचा दोनदा मानकरी ठरला. (Shivraj Rakshe Maharashtra Kesari) शिवराजने कुस्ती क्षेत्रात केलेल्या चमकदार कामगिरीची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली. शिवराज राक्षे हा आता सरकारी सेवेत दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवराज राक्षे याला शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र (Appointment letter) दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर भागातील राक्षेवाडी गावचा रहिवासी असलेला शिवराज राक्षे हा कुस्ती क्षेत्रातील महत्वाचा कुस्तीपट्टू आहे. बलदंड शरीरयष्टी लाभलेला शिवराज राक्षे हा महाराष्ट्र केसरीचा दोनदा विजेता ठरलेला आहे. शिवराजने क्रिडा क्षेत्रात केलेल्या जबरदस्त कामगिरीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून शिवराज राक्षे याची क्रिडा अधिकारी म्हणून राज्य शासनाच्या सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरी शिवराज काळुराम राक्षे याची पुणे महानगर पालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. क्रीडा अधिकारी नियुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी नियुक्तीसाठी शैक्षणिक अहर्ता शिथील करण्याच्या विशेष प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मान्यता दिली. त्यानंतर शिवराज राक्षे याच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. शिवराज याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कम असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलं. शिवराज याने महेंद्र गायकवाड याला पराभूत करत पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं होतं. त्यानंतर धाराशिव येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने आपला मित्र असलेल्या हर्षेवर्धन सद्गीर याला चीतपट करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता.
कोण आहे शिवराज राक्षे?
पुणे जिल्ह्यामधील राजगुरुनगरमधील राक्षेवाडी गावचा हा पैलवान गडी. शिवराज याला त्याच्या घरातूनच कुस्तीचे धडे शिकवले गेले, कारण वडिल आणि आजोबा यांनीही पैलवानकी केली होती. राक्षे कुटुंबाची इच्छा होती की शिवराजने महाराष्ट्र केसरीचं मैदान मारत चांदीची गदा पटकावी. वडील शेतीबरोबर दुधाचा व्यवसाय करतात, घरच्यांनीही शिवराजला तयारीसाठी कोणतीही कमी पडू दिलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या तालमीमध्ये शिवराज सराव करतो.