Ram Shinde : आमदारांच्या स्वीय सहाय्यक आणि चालकांच्या पगारात लवकरच वाढ, सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित उच्चस्तरीय बैठकीत निर्णय !
मुंबई, दि.07 मार्च, 2025 : विधिमंडळ सदस्यांच्या स्वीय सहायकांना मासिक वेतन तीस हजारावरून चाळीस हजार करणे तसेच वाहनचालकांचे मासिक वेतन वीस हजारावरून तीस हजार करणे, विमा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबतचा निर्णय लवकरच लागू करण्यात येईल,असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दिले.

07 मार्च, 2025 रोजी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्वीय सहाय्यकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने उच्चस्तरीय बैठक विधानभवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी उप मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी स्वीय सहायक शिष्टमंडळाकडून समस्या ऐकुन घेतल्यावर हा निर्णय घेतला.

सध्या स्वीय सहायक म्हणून कार्यरत असलेल्यांना कोणत्याही प्रकारचा सेवेचा दर्जा नाही, त्यांना गट-ब अराजपत्रित किंवा तत्सम दर्जा देण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. स्वीय सहायकांचे शिक्षण आणि अन्य अर्हता तपासून याबाबत उचित कार्यवाही केली जाईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले.

या बैठकीस प्रधान सचिव, वित्त विभाग श्रीमती रिचा बागला, उपसचिव वित्त विभाग श्री. धोत्रे, विभानमंडळ सचिवालयाचे सचिव (1) कायर्भार श्री.जितेंद्र भोळे यांच्यासह सर्वपक्षीय सन्माननीय विधानपरिषद व विधानसभा सदस्यांचे स्वीय सहायक मोठ्या संख्येने उपस्थित होते.