‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रमाणे चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ उभारावा – सभापती प्रा. राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी येथील जन्मस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ प्रमाणे चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ वुमन एम्पॉवरमेंट’ पुतळा उभारण्याबाबत तसेच त्यांच्या प्रेरक जीवन कार्याची माहिती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी, या दृष्टीने संग्रहालय बनविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असल्याचे विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

Punyashloka Ahilyadevi Holkar Statue of Women Empowerment should be erected at Chondi like the Statue of Unity - sabhapati Ram Shinde

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जागतिक महिला दिन आणि पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाचे उद्दीष्टे व महिला सक्षमीकरण संदर्भातील प्रस्ताव मांडला.

सभापती प्रा.शिंदे म्हणाले की, आजची महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजे, यादृष्टीने महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहे. आज सर्व क्षेत्रांमध्ये माता भगिनी कर्तृत्वाची गरुडभरारी घेत आहेत, असे सांगून त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

महिलांसाठी प्रत्येक विभागाचे विशेष धोरण असणे गरजेचे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील प्रत्येक विभागाचे महिलांसाठी विशेष धोरण असले पाहिजे, जेणेकरून महिलांविषयीच्या कायद्यांची, नियमांची आणि त्यांच्या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करता येईल  असे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, 2030 ला शाश्वत विकास उद्दिष्टांबद्दल शासनाने जबाबदारी घेऊन 15 वर्ष होत आहेत. या जबाबदारीनुसार 2030 मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% महिला असतील असा हेतू ठरलेला आहे. केंद्राने आणि राज्यांनी आणलेल्या योजनांमुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला आहे. आज विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी प्रगती केली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांची धार्मिक निष्ठाही मोठी होती. त्यांनी अनेक घाट बांधले, मंदिरांचा जिर्णोद्धार केला. अनेक लोककल्याणकारी कामे केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. त्यांच्या या कार्यातून त्यांच्या समाजसेवेचा आणि धार्मिक कार्याचा वसा दिसून येतो. राज्यातील प्रजेला सुखी करणे हे पहिले कर्तव्य त्यांनी मानले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

शासकीय योजना स्त्रीच्या उन्नतीसाठी – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आजची स्त्री ही जबाबदार असून तत्व, स्वत्व आणि महत्त्व कधीही सोडत नाही. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या डोक्यावरील घागर काढण्याचा उद्देश सफल झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या योजना ह्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी आहेत. स्त्री शक्तीला ताकद देण्याचे काम शासन करीत आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.

महिलांनी आर्थिक सक्षम व्हावे यासाठी त्यांना शिक्षण गरजेचे आहे. शालेय जीवनापासूनच नैतिकतेचे आणि स्वरक्षणाचे धडे देण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. 

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सभागृहात महिलांची संख्या वाढणे गरजेचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. त्यांनी देशातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांचा जिर्णोद्धार केला. त्याठिकाणी सोयी सुविधा उभारल्या, घाट बांधले.
या प्रस्तावावरील चर्चेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सदस्य सदस्य प्रज्ञा सातव, चित्रा वाघ, डॉ.मनिषा कायंदे, उमा खापरे, अमोल मिटकरी, भावना गवळी, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनीही विचार मांडले.