Ashadhi Rath Yatra 2025 : सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होणार ४ मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, आषाढी रथयात्रेनिमित्त कर्जत जामखेडमध्ये गुरुवारी होणाऱ्या अनोख्या भक्ति सोहळ्याची राज्यात चर्चा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख : शेकडो वर्षांची परंपरा असलेला जवळा, नान्नज, चोंडी व चापडगाव येथील रथयात्रोत्सव यंदा मोठ्या उत्साहात सुरु आहे. उद्या गुरुवारी (दि. १० जुलै) रोजी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या पुढाकारातून आषाढी रथयात्रेनिमित्त चार धार्मिक स्थळांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सभापती प्रा राम शिंदे हे स्वता: हेलिकॉप्टरमधून पृष्पवृष्टी करणार आहेत. यंदाचा आषाढी रथयात्रोत्सव यामुळे ऐतिहासिक ठरणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या ऐतिहासिक भक्तिसोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक सज्ज झाले आहेत. श्रद्धा, भक्ती व आधुनिकतेच्या संगमातून यंदा यात्रोत्सवाच्या इतिहासात नवे सोनेरी पान जोडले जाणार आहे, अशी माहिती भाजपा नेते तथा जवळ्याचे उपसरपंच प्रशांत शिंदे यांनी दिली.

शेकडो वर्षांची परंपरा असलेला जवळा, नान्नज, चोंडी व चापडगाव येथील रथयात्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. हजारो भाविक या रथयात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजेरी लावत असतात.यंदा होणारा रथयात्रोत्सव खास असणार आहे. विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या संकल्पनेतून आषाढी रथयात्रेनिमित्त जवळा येथील श्री जवळेश्वर मंदिर, नान्नज येथील नंदादेवी मंदिर, चोंडी येथील अहिल्येश्वर मंदिर, चापडगाव येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या चार देवस्थानांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. प्रा राम शिंदे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या या भक्तिमय कृतीचे हजारो भाविकांकडून स्वागत केले जात आहे. संतपरंपरा, भक्ती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते गुरूवारी सकाळी ७:३० वाजता चापडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच चोंडी येथील अहिल्येश्वर मंदिर या देवस्थानांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर प्रा शिंदे हे चोंडी व चापडगाव येथील रथाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शिंदे याच्या हस्ते जवळा येथील जवळेश्वर मंदिर व नान्नज येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्यानंतर ते जवळा व नान्नज रथाचे दर्शन घेण्यासाठी रवाना होणार आहेत. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जवळा, नान्नज, चोंडी व चापडगाव येथे हेलिकॉप्टरमधून श्रींच्या पालखी, रथ व मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे.
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री जवळेश्वर रथयात्रेला दरवर्षी हजारो भाविक उपस्थित राहतात. यंदा यात्रेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह आहे. हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आषाढी रथ यात्रोत्सवातील एक वेगळीच अनुभूती ठरणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे जवळा, नान्नज, चोंडी व चापडगाव येथील देवस्थानांवर हेलिकॉप्टरमधून होणाऱ्या पुष्पवृष्टी सोहळ्याची स्थानिक पोलिस प्रशासन व आयोजकांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
आषाढी रथयात्रेनिमित्त जवळा, नान्नज, चोंडी व चापडगाव येथे पारंपरिक यात्रा, नाचगाणी, दिंड्या आणि रथोत्सव यांचा भरगच्च कार्यक्रम सुरू असतानाच हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी यात्रेला वैभव प्राप्त करून देणार आहे. यामुळे केवळ कर्जत-जामखेड नव्हे तर संपूर्ण राज्यात या अनोख्या भक्तिसोहळ्याची चर्चा सुरू झाली आहे.
जवळेश्वर महाराजांच्या रथयात्रेला यंदा अनोखा गौरव लाभत आहे. – प्रशांत शिंदे
यंदा पहिल्यांदाच जवळेश्वर मंदिरावर रथयात्रेनिमित्त हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. हा फक्त फुलांचा वर्षाव नाही, तर श्रींच्या भक्तीचा आणि गावाच्या श्रद्धेचा गौरव होणार आहे. आमचे नेते प्रा. राम शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून हा सोहळा होणं, ही गावासाठी सन्मानाची बाब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी एकजुटीने ही यात्रा जपतात आणि सजवतात. उद्या होणाऱ्या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन भाजपा नेते तथा जवळा गावचे उपसरपंच प्रशांत शिंदे यांनी केले आहे.