कर्जत व जामखेड तालुक्यातील शासकीय निवासी शाळेच्या कर्मचारी निवासस्थानासाठी १३ कोटी ३४ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा. राम शिंदे

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींसाठी सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या शासकीय निवासी शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून नाशिक प्रादेशिक विभागातील १० शाळांसाठी भरीव निधी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी सुमारे १३ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

Rs 13 crore 34 lakh approved for staff accommodation of government residential schools in Karjat and Jamkhed talukas -  sabhapati Ram Shinde

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलां-मुलींकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत राज्यात १०० शासकीय निवासी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासाची सोय शाळेच्या आवारातच व्हावी. तसेच, त्यांना निवासी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसोबत कायमस्वरूपी राहता यावे, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करता यावे, यासाठी संबधित शासकीय निवासी शाळेच्या आवारात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेमध्ये कर्मचारी निवासस्थान बांधणे तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या कला, क्रिडा गुणांना वाव देण्याकरिता आवश्यक सोयी-सुविधा निर्माण कराव्यात अशी सतत मागणी होत होती. अखेर सरकारने ही मागणी मान्य केली आहे.

कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकीय निवासी शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवासस्थानासाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा याकरिता विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा हाती घेतला होता. शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. जामखेडसाठी ६.६७ तर कर्जतसाठी ६.६७ असा एकुण १३ कोटी ३४ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विभागाने आज ११ जून रोजी जारी केला आहे. सरकारने शासकीय निवासी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी भरीव निधी मंजुर केल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

कर्जत व जामखेड तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना शासकीय निवासी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता माझा नेहमी आग्रह राहिला आहे. या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था शाळेच्या आवारात झाली तर शिक्षक हे विद्यार्थ्यांवर नेहमी लक्ष ठेवतील.विद्यार्थांना चांगले संस्कार लाभतील. ही बाब विचारात घेऊन कर्मचारी निवासस्थानासाठी सरकारकडे निधीची मागणी केली होती. सरकारने कर्जत व जामखेड तालुक्यासाठी १३ कोटी ३४ लाख रूपयांचा भरीव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व महायुती सरकारचे मनापासून आभार !

प्रा राम शिंदे सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद