जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात गुलाब चक्रीवादळाचा प्रभाव जाणवू लागला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. मराठवाड्यात पावसाने अक्षरशा: धुमाकुळ घातला आहे. तसेच विदर्भातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. ऊर्वरित महाराष्ट्रातही पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. काही गावांचा संपर्क तुटल्याचेही समोर आले आहे.मराठवाड्यात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात नागरिक अडकून पडले आहेत.(Red alert issued in several parts of the state, possibility of heavy rains; Flood situation in Marathwada)
हवामान हवामान विभागाकडून आज जारी केलेल्या नव्या हवामान अंदाजानुसार राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादेत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.पुढील काही तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या दोन्ही विभागातील सात जिल्ह्यांना उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. ज्यात काही ठिकाणी 200 मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर औरंगाबादसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. अशात ह्या भागात 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असेल.
मराठवाड्यात पुर परिस्थिती
उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून धरणांतून पाणी सोडल्याने नद्यांनी पुराची पातळी ओलांडली आहे. , नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली. उस्मानाबादमधून जाणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे.
मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे ग्रामपंचायत सभागृहात पाणी शिरल्याने 125 जण अडकले आहे. इरला येथील प्राथमिक शाळेत 150 जणांना सुखरूप हलविण्यात आले असून पुराच्या पाण्यातून चौघा जणांची तेर येथून सुटका करण्यात आली. तर दाऊदपूर येथे अद्यापही सहाजण अडकलेले आहेत. पुणे येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील सारसा गावातील लोक अडकले असल्याची माहिती आहे. पावसाचा वेग अजूनही जोरदार आहे. औरंगाबाद शहरातही गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर आणि कन्नड या दोन तालुक्यांना पुराचा फटका बसला असून शिऊर-आलापूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. बनोटी, निंबायती, निंभोरा, सावळदबारा, पित्तूर या गावांत घरांची पडझड झाली असून काही घरांमध्ये पाणीही शिरले आहे.
सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धानोरा ते पूर्णवाडी या भागात पाणीच पाणी झाले आहे. पूर्ण नदीला पूर आल्याने काकडेवाडी या गावाचा संपर्क तुटला आहे. शिवनाटाकळी हे धरण भरल्यामुळे 16 हजार क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात आले आहे. कन्नड व गंगापूर तालुक्यातील नदीकिनारच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात 24 तासांत सावधानतेचा इशारा देण्यात आला असून अंबाजोगाई आणि केज येथील पूरस्थितीचा सामना करणाऱ्यांना सुखरूप हलविण्यात आल आहे. अंजनापूर, आपेगाव, इस्तळ येथेही काही नागरिक अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातही रात्रभर पाऊस सुरू आहे. पुरात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान पोहोचत असून काही ठिकाणी पुरातील व्यक्तींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले आहे पण त्याचे आता कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता आहे.
अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ
‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे.
पुढील काही तासात धुळे, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात या चक्रीवादळचा मोठा परिणाम जाणवत आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात गेल्या ४८ तासांत ढगफुटीसदृष्य पाऊस सुरु आहे.